गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : झोका (Rope) बालपणीच्या वयात सर्वांच्याच आवडीच्या मौज मजेचे साधन असतो. पण हा झोकाच एका चिमुकल्याच्या जीवावर बेतला आहे. हिंगोलीत झोक्यामुळे सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मृत्यूने कवटाळल आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे हिंगोलीतील (Hingoli) कोथळज गावावर शोककळा पसरली आहे. झोक्याच्या गळ्याला पीळ बसल्याने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला मृत्यू झाला आहे.
हिंगोली तालुक्यातील कोथळज गावातील सहावीच्या वर्गात सूरज मसाजी नरवाडे हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. सूरज हा वर्गात हुशार आणि गुणी विद्यार्थी होता. वर्षाचा असतानाच सूरजच्या वडिलांचे निधन झाले होते. सुरजला एक मोठा भाऊ आणि बहिण देखील आहे. तिन्ही भावडांचे संगोपन त्याची आई रोजमजुरी करून करते. घरचा व्यवसाय किंवा शेती नसल्याने सुरजचा मोठा भाऊ अर्धवट शिक्षण सोडून कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळावं आणि सूरज आणि त्याच्या बहिणीला शिकवून अधिकारी बनवावं म्हणून पुणे येथील एका कंपनीत काम करतोय.
5 सप्टेंबर रोजी शाळेत शिक्षक दिन असल्याने सूरज नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. संध्याकाळी चार वाजता शाळा सुटल्यावर मित्रांबरोबर सूरज घराकडे धावत आला. कारण त्याचा प्राणप्रिय असलेला झोका त्याला खुणावत होता. सूरजची बहीण गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्याने समगा येथील शाळेत गेली होती. तर आई नेहमीप्रमाणे शेत कामाला गेली होती. साडेचार वाजण्याच्या सुमारास सूरज घरी परतला आणि घरात असलेल्या साडीच्या झोक्यात झोका खेळायला सुरुवात केली.
त्यावेळी झोक्याला पीळ देत असाताना झोका त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला. पीळ अधिकचा बसल्याने त्याला पीळ काढणे कठिण झाले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. सूरचा झोक्याचा पीळ बसल्याची ही घटना खेळण्यासाठी बोलवायला आलेल्या वर्गमित्राने बघितली. त्याने ही घटना त्याच्या शेजारी राहत असलेल्या मित्राला पळत जाऊन सांगितली. त्याचे मित्र घरात येईपर्यंत सूरज अस्वस्थ झाला होता. गावातीलच प्राध्यापक लखन बघाटे यांनी सूरजला रुग्णालयात तात्काळ दाखल केले. मात्र तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून सुरजला मृत घोषित केले. यावेळी त्याची आई, बहीण आणि मोठ्या भावाने हंबरडा फोडला.
दरम्यान, लहान मुले झोक्यावर सहज उलटा पीळ घेत असतात. पण हा पीळ त्यांच्या जीवावर बेतू शकतो हे त्यांना माहिती नसते. त्यामुळे पालकांनी झोक्याचा पीळ घेताना काळजी घेतली पाहिजे.