मुंबई / रत्नागिरी : Ratnagiri power project Update : दाभोळचा गॅसवरील वीज निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. प्रकल्प पुन्हा सुरु करण्यासाठी नैसर्गिक वायू आयात करण्याची तयारी करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर (Guhagar) येथे असलेला महाराष्ट्रातील सर्वात मोठा रत्नागिरी गॅस आणि वीज निर्मिती प्रकल्प (RGPPL) सध्याच्या स्थितीत बंद अवस्थेत आहे.
वीजेची मागणी आणि कोळशाच्या तुटवड्यावर तोडगा म्हणून नैसर्गिक वायू आधारित वीज निर्मिती प्रकल्प सुरु करावेच लागतील, असा केंद्रीय ऊर्जा विभागाचा अंदाज आहे. त्यादृष्टीने पावलं उचलली जात आहेत. वीजेसाठी 22 ते 25 रुपये प्रति युनिट मोजावे लागणार आहेत. देशात एकूण 5 गिगा वॅट नैसर्गिक वायू आधारित वीज निर्मिती प्रकल्प आहेत.
नॅचरल गॅस पुरवठ्याअभावी रत्नागिरी गॅस प्रकल्प वर्षापासून बंद असल्याने तो पुन्हा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
रत्नागिरी गॅस आणि वीज निर्मिती प्रकल्प अडचणीत आला होता. अपुरा गॅस पुरवठ्यामुळे हा प्रकल्प बंद अवस्थेत आहे. त्यामुळे आरजीपीपीएल प्रकल्पाचे भवितव्य अंधारात होते. या प्रकल्पावर अवलंबून असणारी सुमारे सहाशे स्थानिक कुटुंबांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त होत होती. आता पुन्हा प्रकल्पाला गती मिळणार असल्याने या कुटुंबाना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.