वाल्मिक जोशी, झी 24 तास जळगाव : खताचे दर वाढले आणि अवकाळी पावसानं आलेला पिकावर पाणी फेरलं. तरी शेतकरी खचून न जाता पुन्हा उभं राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच वेळी आता व्यापाऱ्याकडून बळीराजाला लुटण्याचा डाव असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रातील जळगावातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील वाघोदे गावात घडल्याची क्लिप सोशल मीडियावर वायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. कापूस खरेदी करताना मापात घोळ करीत असल्याच्या संशयावरून कापूस व्यापाऱ्यास चोप दिल्याची घटना घडली आहे.
जळगावातील अनेक खेडे गावात कापूस व्यापारी हे गावात जाऊन कापूस खरेदी करीत असतात, अशाच एका घटनेत आज एक कापूस व्यापारी अमळनेर तालुक्यातील वाघोदे गावात जाऊन कापूस खरेदी करीत होता.
यावेळी कापूस व्यापारी हा आपल्या वजन काट्याच्या माध्यमातून हेराफेरी करीत असल्याचा काही ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी त्याला जाब विचारला असता त्याने उडवा उडवी ची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
व्यापारी खोटे बोलत असल्याचं लक्षात आल्यावर काही तरुणांनी त्याला चोप देत, वजन काट्यात त्याने केलेल्या घोळा ची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना देण्या बाबत आग्रह धरला.
यावेळी शेतकऱ्यांचा वाढता संताप पाहून व्यापाऱ्याने माफी मागितली. संबंधित शेतकऱ्याला रक्कम परत केल्याने,गावातील काही मंडळींनी हा वाद तिथेच मिटवला. त्या व्यापाऱ्याला गावातून बाहेर जाण्यास प्रवृत्त केल्याच्या माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो सावधान! जेव्हा कापूस मापत असतील तेव्हा तुम्ही त्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते.