जळगाव : राज्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोना संसर्ग बेफाम वेगाने पसरत आहे. त्यामुळे जिल्ह्यात 31 तारखेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. परंतु दरम्यान होळी आणि धुळवडचा सण असल्याने नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी पोलिसांनी हायटेक मार्ग अवलंबला आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत जळगावमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
होळी आणि धुळवडसारख्या सणावेळी मोठ्या संख्येने लोकं एकत्र येतात आणि रंगांचा सण साजरा करतात. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहावं, गर्दी करू नये, संसर्ग पसरू नये म्हणून जळगाव पोलिसांनी थेट हायटेक मार्ग अंवलंबला आहे.
जळगाव शहरात धुळवड साजरा करून गर्दी करणाऱ्या अतिउत्साही लोकांवर थेट ड्रोनच्या सहाय्याने नजर ठेवण्यात येणार आहे. ड्रोन कॅमेऱ्याने टिपलेल्या लोकांवर पोलीस योग्य ती कारवाई करणार आहेत.
त्यामुळे नागरिकांनी घरातच राहून सण साजरे करावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.