Jayant Patil On NCP And BJP: राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्याचं वृत्त फेटाळलं आहे. मागील अनेक दिवसांपासून आपण 'सिल्व्हर ओक'वर जाऊन शरद पवारांची भेट घेत आहोत. पक्षवाढीसंदर्भातील कामांसाठी मी रोज शरद पवारांना भेटत आहे. कालही मी माझ्या घरी वरिष्ठ आमदारांबरोबर होतो. तर मला पुण्याला जायला वेळ कधी मिळणार? असा उलट प्रश्न जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना विचारला. प्रसारमाध्यमांनीच या बातम्या पेरल्याचं सांगताना महाराष्ट्रातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होत असल्याचंही जयंत पाटील म्हणाले. यावेळेस जयंत पाटील यांना महायुतीकडून ऑफर आली आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तसेच अन्य एका पत्रकाराने तुम्ही कायम शरद पवारांबरोबरच राहणार का असाही प्रश्न विचारला. या दोन्ही प्रश्नांना जयंत पाटलांनी सविस्तर उत्तरं दिली.
आपली कोणाशीही चर्चा झालेली नाही. मी कशाबद्दलही कोणालाही काही सांगितलेलं नाही. कोणालाही भेटलेलो नाही असं जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंना सांगितलं. त्यानंतरही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी जयंत पाटील यांनी, "तुम्हाला महायुतीकडून ऑफर आलेली आहे का?" असा प्रश्न विचारला. त्यावर जयंत पाटील यांनी, "माझी कोणाशीही चर्चा झालेली नाही. मी शरद पवारसाहेबांना काल, परवा, तेरवा रोज भेटतोय. आमचे विधानसभेचे, विधानपरिषदेचे सदस्य त्यांना भेटत आहेत. कालपासून ज्या बातम्या सुरु आहेत त्या मोबाईलवर येतात त्यातून माझीही करमणूक होतो. आज सकाळी त्यात भर पडली. दुपारी आणखीन भर पडली. ही करमणूक चालू आहे ही महाराष्ट्रातील जनतेमध्ये माझ्याबद्दल गैरसमज परसवणारी आहे. माझ्याबद्दल गैरसमज पसरवणे योग्य नाही," असं जयंत पाटील म्हणाले.
यानंतर अन्य एका पत्रकाराने जयंत पाटील यांना, तुम्ही कायम शरद पवारांबरोबरच राहणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना जयंत पाटील यांनी, "हा काय प्रश्न आहे का? बातम्या तुम्ही चालवत आहात. तुम्हीच विश्वास हलवण्याचा फार प्रयत्न करत आहात. महाराष्ट्रातील लोक मला ओळखतात. काही असेल तर मी तुम्हाला सांगेनच की. माझी प्रसिद्धी झाली पण ती नकारात्मक प्रसिद्धी झाली. माझी एकच विनंती आहे की असं पुन्हा पुन्हा होऊ देऊ नका," अशी विनंती अगदी हात जोडून केली. "काल मी इंडियाच्या बैठकीमध्ये बसलो होतो. जाणूनबुजून अशा बातम्या पसरवण्याची काही गरज नाही," असं म्हणत जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच प्रसारमाध्यमांनी बातम्या पसरवल्या आहेत तर त्यांनीच स्पष्टीकरण द्यावं असंही जयंत पाटील म्हणाले.