किरण ताजणे, पुणे : पुण्यात येऊन एका व्यापाऱ्याला ५५ लाख रुपयांना लुटणाऱ्या तिघा कानडी चोरांना पोलिसांनी थेट कर्नाटकातून अटक केली.. पुणे पोलिसांनी या कानडी चोरट्यांच्या मुसक्या कशा आवळल्या. गेल्या ३१ डिसेंबरला ही घटना घडली होती. करण माळी हे सोन्याचांदीचे व्यापारी रविवार पेठेत दागिने खरेदी करून घरी जात होते. त्यावेळी आर सी एम कॉलेजसमोर त्यांच्या गाडीवर ऑईल टाकण्यात आलं. तुमच्या गाडीतून ऑईल सांडतं आहे, असा बनाव करून माळी यांना गाडीबाहेर बोलावण्यात आलं. त्याचवेळी चोरांनी गाडीतली 55 लाख 62 हजार रुपयांच्या दागिन्यांची बॅग लंपास केली.
आपल्याला लूटल्याचं लक्षात येताच माळी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तब्बल 700 सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेत थेट कर्नाटकातून या तिन्ही चोरांना अटक केली.
शंकर लक्ष्मण आचारी उर्फ शेट्टी, यादगीर लक्ष्मण आचारी आणि मेरी व्यंकटेश नायडू अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार आणि कटाचे मुख्य सुत्रधार व्यंकटेश नायडु, शांता लक्ष्मण आचारी, लक्ष्मण आचारी हे मात्र अजूनही फरार आहेत. हीच मोडस ऑपरेंडी वापरून अशाच प्रकारे कोथरुडमध्येही ७ लाख रुपयांची चोरी करण्यात आली होती... या टोळीकडून आणखी मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.