मुंबई / रत्नागिरी : Khed Mayor vaibhav khedekar has been disqualified for six years : खेडचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर(Vaibhav Khedekar) यांना सहा वर्षांसाठी अपात्र करण्यात आले आहे. राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही अपात्रेची कारवाई केली आहे. शिवसेना नगरसेवकांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर ही मोठी कारवाईत करत मनसेला मोठा धक्का दिला आहे.
वैभव खेडेकर हे मनसेचे कोकण विभागीय सरचिटणीसही आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी अपात्र करण्याचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम, 1965 चे कलम 55 ब मधील तरतुदीनुसार या आदेशाच्या दिनांकापासून 6 वर्षाचा कालावधी समाप्त होईपर्यंत त्यांना नगरपरिषद सदस्य म्हणून निवडले जाण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. (MNS leader and Mayor Vaibhav Khedekar has been disqualified for six years)
शिवसेना नगरसेवकांनी खेडेकर यांच्या विरोधात तक्रार करून चौकशी करून अपात्र करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. खेडेकर यांना नगराध्यक्षपदावर चार वर्षांहून अधिक कालावधी झाल्याने या कालावधीत संबंधित नियम, शासनाचे स्थायी निर्देश याची पूर्णत: माहिती त्यांना असणे गृहीत आहे. त्यांच्यावरील दोषारोपाचे निष्कर्ष पाहिले असता, त्यांची कोणतेही नियम न पाळता कामे करण्याची वृत्ती प्रकर्षाने दिसून येते, असे ही कारवाई करताना ठपका ठेवण्यात आला आहे.
दरम्यान, याप्रकरणी खेडेकर यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आलेली होती. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे, नियमातील तरतुदी व माझ्यासमोर ठेवण्यात आलेली कागदपत्रे पाहिली असता खेडेकर यांच्यावरील सर्व दोषारोप सिध्द होतात या निष्कर्षाप्रत मी आलो आहे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.