पिंपरी-चिंचवड : Kidnapping in Pimpri Chinchwad : एक धक्कादायक बातमी. 300 कोटी रुपयांच्या क्रिप्टो करन्सीसाठी अपहरण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने 300 कोटींच्या क्रिप्टो करन्सीसाठी त्याच्या साथीदारांसोबत एका व्यक्तीच अपहरण केल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोलीस शिपायासह सात जणांना अटक केली आहे.
संबंधित पोलीस शिपाई हा पुणे पोलीस दलात सायबर विभागात कार्यरत असताना एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सी असल्याच त्याला समजले होते. पैशाच्या लालसेपोटी त्या व्यक्तीचे अपहरण केले तर मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सी आणि पैसे मिळू शकतात, असे विचार त्याच्या मनात घोळू लागले. त्यामुळे त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून त्या व्यक्तीचे अपहरण केले.
मात्र, वाकड पोलिसांनी अपहरणाचा मास्तरमाइंड असलेल्या पोलिसाला सापळा लावून बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे हा मास्टरमाईंड पोलीस शिपाई असल्याचे समोर आल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली. दिलीप तुकाराम खंदारे अस अटक केलेल्या मास्टर माईंड आरोपी नाव आहे. त्याच्यासह सुनील राम शिंदे, वसंत श्यामराव चव्हाण, फ्रान्सिस टिमोटी डिसूझा, मयुर महेंद्र शिर्के आणि प्रदीप काशिनाथ काटे, शिरीष चंद्रकांत खोत, संजय ऊर्फ निकी राजेश बंसल यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली.
आरोपींनी विनय सुंदरराव नाईक यांचे 14 जानेवारी रोजी ताथवडे येथील एका हॉटेलमधून अपहरण केले होते. याप्रकरणी रफिक अल्लाउद्दीन सय्यद यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर तांत्रिक विश्लेषण सुरु केले. दरम्यान पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण आरोपींना लागली. त्यांनी नाईक यांना वाकड भागात सोडले आणि आरोपी पळून गेले. आरोपींनी बिट कॉइन आणि आठ लाख रुपयांची मागणी केल्याचे नाईक यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक बाबींचा आधार घेत आरोपीना अटक केली, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली.