मुंबई : क्यार चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून दूर गेले आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. क्यार वादळाचा सिंधुदुर्गातील देवगड, मालवण तालुक्यातील समुद्र किनाऱ्याला जोरदार तडाखा बसला आहे. समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा आदळत आहेत. शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. देवगड तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली आहेत. क्यार वादळामुळे काही मच्छिमारांची जाळीही सुमद्रात वाहून गेली होती. भात शेतीत पाणी साचून शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं.
Very likely to move WNW till 30th October re-curve WSW thereafter & move towards Gulf of Aden off south Oman-Yemen coasts during subsequent 3 days. It is very likely to maintain the intensity of a Super Cyclonic Storm till 28th October evening and weaken gradually thereafter. 2/2 pic.twitter.com/m0JR0Ewt1n
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 28, 2019
आता ओमनच्या दिशेने क्यारचा प्रवास सुरु झाला आहे. क्यार चक्रीवादळ हे 3 दिवसात ओमनला जाऊन धडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता मुंबईत पावसाची शक्यता नाही हे स्पष्ट झाले.
मात्र पुढील 24 तासात मराठवाड्यात मध्यम तसेच जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे केरळ किनारपट्टीवर पाऊस पडणार पण कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या किनारपट्टीपेक्षा लांब असल्याने पाऊस पडणार नाही पण ढगाळ वातावरण राहील असे सांगण्यात आले आहे.
अरबी समुद्रात उठलेल्या 'क्यार' चक्रीवादळाची तीव्रता वाढत असली तरी ते पश्चिमेला सरकत असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत वादळी पाऊस होण्याची शक्यता कमी झाली आहे. किनारपट्टी भागातील हवामान रविवारपासून सामान्य होणार असल्याचं हवामान विभागाचे उपमहासंचावक कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केलं आहे.
क्यार चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरीच्या किनारपट्टीला देखील बसला. चक्रीवादळामुळे समुद्र चांगलाच खवळला आहे. अजस्त्र लाटांचा मारा किनारपट्टी भागात झाला. रत्नागिरीच्या मांडवी किनारपट्टीतही समुद्राचं पाणी मानवीवस्तीत घुसलं. तसेच या वादळाचा फटका हा गणपतीपुळे देवस्थानला देखील बसला आहे. गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर, बोर्या बंदर या ठिकाणी देखील लाटांचा मारा अधिक होता. तसेच हर्णे, आंजर्ले आणि दाभोळ किनारपट्टीला देखील याचा फटका बसला आहे.
अरबी समुद्रात तयार झालेलं क्यार चक्रीवादळ रायगडच्या दिशेने सरकण्याची शक्यता लक्षात घेऊन किनारपट्टीच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये तसेच खोल समुद्रात गेलेल्या बोटी परत किनाऱ्यावर आणाव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहावं अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.