शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर शहरावर भीषण पाणी संकटाचे ढग दिवसेंदिवस गडद होऊ लागले आहेत. कारण मृत साठ्यात असलेल्या मांजरा धरणात आता फक्त ०५.८४ दलघमी पाणी साठाच शिल्लक आहे. येत्या १ सप्टेंबर पासून लातूर शहराचा पाणी पुरवठा १५ दिवसाआड करण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने सादर केलाय. ज्यात सप्टेंबर महिन्यात फक्त दोनदा होणार पाणी पुरवठा होणार आहे. तसेच येत्या ०१ ऑक्टोबर पासून लातूरला नळाद्वारे केला जाणारा पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद केला जाणार असल्याचेही या प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे.
२९ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावर सर्वानुमते निर्णय केला जाणार आहे. याशिवाय उस्मानाबाद येथून रेल्वेने पाणी पुरवठा करणे, माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प, घरणी-साकोळ येथील प्रकल्पातून टँकरने पाणी आणून वितरण करण्याचेही या प्रस्तावात नमूद आहे. ज्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
या सर्वसाधारण सभेत नेमका काय निर्णय होतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. लातूर महापालिकेत सध्या भाजपची सत्ता असून विरोधी पक्षात काँग्रेस सत्तेत आहे. एकूणच लातूरमध्ये अत्यल्प झालेल्या पावसामुळे लातूरकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.