मुंबई : उत्तर पूर्व मुंबईचे भाजपाचे उमेदवार मनोज कोटक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले. त्यांच्यासोबत गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहताही उपस्थित आहेत. उत्तर पूर्व मुंबईतून किरीट सोमय्यांऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. या ठिकाणाहून सोमय्यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा कडवा विरोध होता. त्यामुळे पक्षाने त्यांचा पत्ता कट करुन मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर केली. या पार्श्वभूमीवर मित्र पक्षाशी संबध राखून ठेवण्यासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.
मनोज कोटक यांची ईशान्य मुंबईत चांगली कामगिरी आहे. याचा विचार करुन त्यांना ही संधी देण्यात आल्याची माहिती भाजपच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. कोटक यांच्या कामकाजावर त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले आहे. मात्र यामुळे या मतदार संघातील सध्याचे खासदार किरीट सोमय्यांचा पत्ता कापला गेला आहे. किरीट सोमय्या यांचा पत्ता कापण्यासाठी शिवसेनेने मोठे भाजपवर दबावतंत्र वापरले होते. त्यात शिवसेनेला यात यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कोटक यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मनोज कोटक नक्कीच खासदार होतील. त्यांनी महापालिकेत चांगले काम केले आहे असा विश्वास यावेळी ठाकरेंनी व्यक्त केला. मला त्यांच्या प्रचाराला जाण्याची गरज लागणार नाही असेही त्यांनी म्हटले. तर युती करताना आम्ही कुठलीही छुपी अट घातली नव्हती असेही ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केले.
सातत्याने शिवसेनेवर टीका करणारे आणि थेट 'मातोश्री' ला टार्गेट करणारे खासदार किरीट सोमय्या यांचे भाजपने तिकीट कापले आहे. उत्तर पूर्व मुंबईतून भाजपकडून लोकसभेसाठी सोमय्या यांच्या ऐवजी मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीचे ते उमेदवार असतील. उमेदवारीचा मार्ग मोकळा व्हावा, यासाठी किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर जाण्याचीही तयारी केली होती. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमय्यांना भेट नाकारल्याचेही वृत्त आहे.