जालना : शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी माघार घेतल्याने जालन्याचा तिढा अखेर सुटला आहे. रावसाहेब दानवे यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे. अर्जून खोतकरांना पुढील मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शिवसेनेकडून ग्वाही मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत खोतकर-दानवे वाद सोडवला गेला आहे. अर्जुन खोतकर यांची समजूत काढण्यात यश आल्याने तिकडे रावसाहेब दानवे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर ठाम होते. याआधी दानवे आणि खोतकरांची भेट देखील झाली. पण खोतकरांनी आपली भूमिका बदलली नव्हती. मुंबईत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर ही त्यांची भूमिका बदलली नव्हती. आपण तयारीमध्ये खूप पुढे गेलो आहोत. त्यामुळे मैत्रिपूर्ण लढतीबाबत विचार व्हावा, अशी गळ त्यांनी पक्षनेतृत्वाला घातली होती. पण अखेर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्यानंतर खोतकरांनी माघार घेतल्याची माहिती आता पुढे आली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शिष्टाई केली होती. मात्र, खोतकर तेव्हाही नाराज होते. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर देशमुख यांनी दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाल्याचे सांगितले. पण दानवे आणि खोतकर हे आपआपल्या विधानावर ठाम होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय आपल्यासाठी अंतिम असेल. असं देखील खोतकरांनी याआधी म्हटलं होतं.