मुंबई : चौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरु होतोय.
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी 'श्रीगणेशजयंती' म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो.
भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखवला जातो तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखवण्याची प्रथा आहे.
त्यामुळे माघी गणेश जयंती ही तिळकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते.
या निमित्त राज्यभर घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशाच्या मुर्तींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.
माघी गणेशोत्सवानिमित्त प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरात गणेशभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलीये.
भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर व्यवस्थापनाने दर्शन व्यवस्थेचं नियोजन केलंय. तसंच घातपाताच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात चोख सुरक्षाव्यस्था तैनात करण्यात आली आहे.
विद्येची देवता असणा-या गणेशाचा जन्मदिवस म्हणजे गणेश जयंती... पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जातीये..
दगडूशेठ हलवाई मंदिराला यानिमित्त फुलांची सजावट करण्यात आलीय. तसंच विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेत.
आज सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय. सगळ्यामुळे मंदिरातील वातावरण भावपूर्ण झालयं.