पुणे : रेशनच्या धान्य गोदामांमध्ये होणारी अफरातफर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उघड केल्यानंतर, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबईहून भरारी पथक जळगावला रवाना झाल्याची माहिती गिरीश बापट यांनी पुण्यात दिली आहे.
हे पथक गोडाऊन सील करुन कागदपत्रं जप्त करणार असल्याचंही त्यांनी सांगीतलय. या संबंधात 3 दिवसांत विभागांतर्गत चौकशी होणार असून संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचंही बापटांनी सांगितलंय.
जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळमधल्या शासकीय गोदामात धाड घालून तिथं कसा गोलमाल चालतो, हे खडसेंनी पुढं आणलं होतं. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या शासकीय गोदामात पन्नास किलोच्या धान्याच्या गोणीत तब्बल दहा ते बारा किलो धान्य चोरी होत असल्याची धक्कादायक बाब यावेळी समोर आली.
दरम्यान या रेशन धान्य घोटाळ्यात सत्ताधारी, तसंच अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला होता, त्यावर मात्र भाष्य करण्याचं बापटांनी टाळलय.