प्रताप नाईक, झी मिडीया, कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील बहुचर्चीत शालिनी सिनेस्टोनची जागा आता ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून कायमस्वरूपी राहणार आहे. कोल्हापूर महानगरपालीकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या संदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध केलंय.
कोल्हापूर जिल्ह्याला कलेचा ऐतिहासिक वारसा लाभलाय. याच कोल्हापूरात चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली. अशा या कोल्हापूरात अनेक स्डुडीओमध्ये हा ऐतीहासीक वारसा जोपासला गेला.
मात्र याच कोल्हापूरात असणा-या शालिनी सिनेस्टोनच्या जागेवरचा आरक्षण उठविण्याचा घाट कोल्हापूर महानगरपालिकेतल्या कारभा-यांनी घातला होता. त्यामुळं ही जागा सुरक्षित राहावी यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि कोल्हापूरच्या जनतेनं लढा उभा केला.
तीव्र लोकभावना लक्षात घेऊन सिनेस्टोनच्या ऐतिहासिक जागेची कोणत्याही स्थितीत जपणूक व्हावी म्हणून, आयुक्त अभिजीत चौधरी यांनी संबंधित जागा ऐतिहासिक वारसास्थळाच्या यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला..
कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील याचे पडसाद उमटले. अनेक नगरसेवकांनी शालीनी सिनेस्टोनच्या जागेच्या व्यवसायीकरणाला विरोध दर्शवुन आयुक्तांच्या निर्णयाचं समर्थन केलं.
कोल्हापूरला चित्रपटाचं माहेरघर म्हटल जातं. याच कोल्हापूरात अनेक दिग्गज कलाकार घडले.. असं असताना सुद्धा काही नगरसेवकांनी शालीनी सिनेस्टोनच्या व्यवसायीकरणाला प्रोत्साहन दिलं. मात्र कलाकार आणि कोल्हापूरी जनतेनं यावर जोरदार अक्षेप नोंदवत हा डाव हाणुन पाडला.