शरद पवारांनी एका दगडात मारले दोन पक्षी! अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला? CM शिंदे, अजित पवारांना धक्का

Maharashtra Assembly Election Big Blow Eknath Shinde Ajit Pawar: आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. त्यानंतर आता थेट रायगडच्या पालकमंत्र्यांविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत ते आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 18, 2024, 08:58 AM IST
शरद पवारांनी एका दगडात मारले दोन पक्षी! अदिती तटकरेंविरुद्ध उमेदवार सापडला? CM शिंदे, अजित पवारांना धक्का title=
राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Assembly Election Big Blow Eknath Shinde Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात पक्षांतर सुरु झालं आहे. असं असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठी इनकमिंग सुरु आहे. शरद पवारांच्या पक्षामध्येही मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुरु असतानाच दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचं चित्र दिसत आहे. अशातच आता रायगड जिल्ह्यामध्येही मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. येथील एका बड्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून आता थेट शरद पवारांच्या पक्षातून हा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच राज्याच्या महिला आणि बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरेंना आव्हान देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

थेट अदिती तटकरेंना आव्हान

मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षातून ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करणाऱ्या या नेत्याकडे माणगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद होतं. मात्र हे पद आणि पक्षही त्यांनी सोडला आहे. ते आता तुतारी हाती घेत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. ज्या नेत्यामुळे आता शरद पवारांच्या पक्षाला रायगडमध्ये अदिती तटकरेंविरुद्ध लढण्यासाठी दमदार संधी मिळाल्याचं मानलं जातंय त्याचं नाव आहे, ज्ञानदेव पवार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पक्ष सोडला आहे. खरं तर सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ज्ञानदेव पवार यांनी शिंदेंची शिवसेना सोडली असली तरी आता ते शरद पवारांच्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन थेट अदिती तटकरेंना आव्हान देणार आहेत. 

शिंदेंबरोबरच अजित पवारांसमोरही मोठी अडचण

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ज्ञानदेव पवार यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने रायगडच्या स्थानिक राजकारणात भूकंप झाला होता. ज्ञानदेव पवार यांनी कोणतीही पूर्व कल्पना न देता नगराध्यक्षपदाचा राजीनामा  रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला होता. नगराध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर ज्ञानदेव पवार लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील दोन आठवड्यांहून अधिक काळापासून होती. अखेर यावर आता शिक्कामोर्बत झालं आहे. ज्ञानदेव पवार हे शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष होते आणि ते स्थानिकांमध्येही प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे ज्ञानेश्वर पवारांनंतर नगराध्यक्ष कोण हा प्रश्न एकनाथ शिंदेंच्या पक्षासमोर असतानाच आता ज्ञानेश्वर पवारांनी थेट शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत शिंदेंबरोबरच अजित पवारांसमोरही मोठी अडचण निर्माण केली आहे. मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा यासाठी ज्ञानदेव पवार यांनी उपोषण केलं होतं. त्यामुळे ते माणगावमध्ये प्रचंड चर्चेत आलेले.

महायुतीला दिला घरचा आहेर

मुंबई-गोवा महामार्गासाठी उपोषण करुन आंदोलन करणाऱ्या ज्ञानदेव पवार यांनी महामार्गाचं रखडलेलं काम तातडीने करण्याची मागणी केलेली. आपल्या आंदोलनादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले सुनील तटकरे, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. ज्ञानेश्वर पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारी महायुतीला आणि त्यांच्या नेत्यांना घरचा आहेर दिला होता. त्यानंतर ज्ञानदेव पवार यांनी थेट नाराजीनाम्याचं रुपांतर राजीनामा करत सर्वांना धक्का दिलेला. 

या स्थानिक नेत्याचा प्रभाव राहणार कारण...

ज्ञानदेव पवार हे कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. श्रीवर्धन मतदारसंघात 60% मतदार हा कुणबी समाजाचा आहे. आता ज्ञानेश्वर पवारांना महाविकास आघाडीकडून शरद पवारांनी उमेदवारी दिल्याने येथील स्थानिक राजकारणात अटीतटीची लढाई होईल असं मानलं जात आहे.