Election Commission seized Crores of cash: सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. आचारसंहिता लागू असल्याने राज्यभरात पोलिसांची प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर आहे. निवडणूक आयोगाच्या धडक कारवाईत राज्यभरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. कुठे एटीएम व्हॅनमधून तर कुठे मोठ्या बॅगमधून रोकड पकडण्यात आलीय. निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रात पैशांचा महापूर आला हे दाखवण्यासाठी ही दृश्यं पुरेशी बोलकी आहेत. आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं धडक कारवाई करत कोट्यवधींचं घबाड जप्त केलंय. राज्यभरात विविध ठिकाणी धाडी टाकून निवडणूक आयोगानं कारवाईचा बडगा उगारलाय.
नालासोपा-यात चक्क एटीएम व्हॅनमधून घेऊ जाणारी तब्बल साडेतीन कोटींची रोकड पकडण्यात आलीय. बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी रक्कम जात असल्याचं सांगून नामी शक्कल लढवण्यात आली. व्हॅनमधील रकमेचा हिशेब जुळत नसल्यानं भंडाफोड झाला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याची सखोल चौकशी करण्याची मागणी बहुजन विकास आघाडीचे नेते उमेश नाईक यांनी केलीय.
त्याखालोखाल मुंबईत 2 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. मुंबई पोलिसांनी काळबादेवी परिसरात 2 कोटींहून अधिक रोकड जप्त केली असून 12 जणांना ताब्यात घेतलंय. याची माहिती इन्कम टॅक्सला देण्यात आली असून, ताब्यात घेतलेल्यांची अधिक चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
जालन्यात तब्बल 52 लाख 89 हजार रुपये जप्त करण्यात आलेत. कारमधून रोकड घेऊन जाणाऱ्या कारचालकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अभिजित सावजी असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कारचालकाचं नाव आहे. कारचालकाला चंदनझिरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करतायत.
जळगाव शहरातील शनिपेठ भागात एका व्यक्तीकडून 25 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलीय. प्रमोद हिरामण पवार नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलंय. सदर व्यक्तीकडे एवढी रक्कम कुठून आली याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. एका बड्या नेत्याची ही रक्कम असल्याची चर्चा आहे.
कोपरखैरणे सेक्टर 17 विभागात निवडणूक आयोगानं कारवाई करत गाडी आणि त्यामधील कुकर जप्त केलेत. एका खासगी गाडीत कुकरचे बॉक्स सापडले. शिंदे गट शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांची निवडणूक निशाणी प्रेशर कुकर आहे. गाडीमध्ये विजय चौगुले यांचं बॅनरदेखील आहे. हे प्रेशर कुकर नेमकं कुणी कशासाठी पाठवलं याचा तपास निवडणूक अधिकरी करत आहेत. मात्र आचारसंहितेच्या काळात कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या निवडणुकीत पैशांचा मोठा पाऊस पडलाय, हे मात्र निश्चित.