Promod Mahajan Murder Full Timeline: भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते प्रमोद महाजनांची हत्या मोठं षड्यंत्र होतं ते कधीतरी बाहेर येईलच, असं विधान त्यांची कन्या आणि भाजपाच्या माजी आमदार पूनम महाजन यांनी 'झी 24 तास'च्या 'जाहीर सभा' कार्यक्रमामध्ये केलं आहे. 'प्रमोद महाजनांची हत्या पैशांसाठी किंवा मत्सरापोटी झाली नाही. हत्येमागे कौटुंबिक कारण नाही,' असंही पूनम महाजन यांनी म्हटलं आहे. प्रमोद महाजनांच्या हत्येनंतर जवळजवळ दोन दशकांनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य सविस्तरपणे बोलले होते. महाजन यांचे सख्खे बंधू प्रविण महाजन यांनी 2006 मध्ये राहत्या घरी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. मात्र प्रमोद महाजनांची हत्या झाली, त्यादिवशी नेमकं काय घडलं?
प्रमोद महाजनांचा मृत्यू होऊन 18 वर्ष झाली आहेत. पण एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांची हत्या का केली? भावाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर नाशिक जेलमध्ये प्रवीण महाजन यांनी 'माझा अल्बम' नावाचं एक पुस्कत लिहिलं. हे पुस्तक वादाचा विषय बनलं. प्रवीण महाजन यांच्या पुस्तकातील काही भाग वर्तमानपत्रातही छापण्यात आला होता. त्यात प्रवीण यांनी "हे सर्व कसं घडलं. आणि कोणी केलं. हे लोकांना कधीच कळणार नाही," असं म्हटलं होतं. मात्र प्रमोद महाजनांची हत्या झाली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? गोळ्यांचा आवाज आल्यानंतर काय झालं? गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजनांना रुग्णालयात नेत असतानाच ते जखमी अवस्थेत त्यांना काय म्हणाले? यासंदर्भातील सविस्तर घटनाक्रम जाणून घेऊयात...
दिवस होता 22 एप्रिल 2006. वार - शनिवार वेळ- सकाळचे 7.30 वाजले होते.भाजप नेते प्रमोद महाजन मंबईतील वरळी परिसरातल्या 'पूर्णा' निवासस्थानी होते. हातात पेपर आणि समोर चहाचा कप. समोरच्या टीव्हीवर बातम्या सुरू होत्या. महाजन कुटुंबीयांसाठी ही सकाळ सामान्य दिवसाप्रमाणेच होती. महाजनांना त्यादिवशी कोणी मोठा नेता किंवा कार्यकर्ते भेटायला येणार नव्हते. त्यामुळे पांढरा कुर्ता घातलेले महाजन दिवसाची नेहमीप्रमाणे सुरूवात करण्याच्या तयारीत होते आणि दरवाज्यावरची बेल वाजली.
प्रमोद महाजनांचे धाकटे बंधू प्रवीण महाजन समोर उभे होते. जिन्स आणि टी-शर्ट घातलेले प्रवीण महाजन आत आले. बहुधा प्रमोद महाजन यांना याची कल्पना नसावी. कारण प्रवीण महाजन फारसे प्रमोद महाजन यांच्या घरी येत नसत. प्रमोद महाजनांनी विचारलं, "तू इथे कसा?" प्रवीण महाजन सोफ्यावर बसले. आणि त्यांनी तक्रारीचा पाढा वाचण्यास सुरूवात केला. प्रमोद महाजन त्यांना वेळ देत नाहीत. व्यापारात मदत करत नाहीत, अशी त्यांची प्रामुख्याने तक्रार होती. त्यानंतर दोन्ही भावात काहीकाळ चर्चा झाली.
अचानक 7. 40 वाजण्याच्या सुमारास 10 मिनिटांपूर्वी मोठ्या भावाला भेटण्यासाठी आलेल्या प्रवीण महाजनांनी आपल्याकडचं 32 बोअरचं पिस्तूल बाहेर काढली आणि प्रमोद महाजनांवर पॅाइंट ब्लँक रेंजवरून गोळ्या झाडल्या. प्रमोद महाजन यांच्या छातीच्या खाली तीन गोळ्या लागल्या. मुंबई पोलिसांनी त्यावेळी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, "प्रवीण महाजन चौथी गोळी फायर करण्यासाठी सरसावले. पण पिस्तूल जॅम झालं. त्यामुळे त्यांना पुढे फायरिंग करता आलं नाही. त्यांच्या पिस्तूलात नऊ बूलेट्स होत्या."
नक्की वाचा >> 'बोलणारा आणि हसणारे दोघेही...', सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा
'पूर्णा' इमारतीत एकच हाहाःकार उडाला आणि धावपळ सुरू झाली. रेखा महाजन यांनी मदतीसाठी गोपीनाथ मुंडेंच्या घरी धाव घेतली. मुंडे याच इमारतीत 12 व्या मजल्यावर रहात होते. मुंडे धावत महाजन यांच्या घरी पोहोचले. त्या दिवशी काय झालं होतं, याबाबत प्रमोद महाजन यांच्या पत्नी रेखा महाजन यांनी कोर्टात साक्ष दिली होती. त्या म्हणाल्या होत्या, "मी बेडरूममध्ये असताना गोळ्यांचा आवाज ऐकला. मी बाहेर आले. प्रवीण महाजनांना पिस्तूलातून प्रमोद महाजन यांच्यावर गोळ्या झाडताना पाहिलं. मी ओरडले. प्रवीण तू हे काय केलंस. मी त्यांना ढकलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मला ढकलून दिलं. तुम्ही माझं ऐकलं नाही. आता भोगा," असं प्रवीण महाजन म्हणाल्याचं रेखा महाजन यांनी कोर्टाला सांगितलं होतं.
प्रमोद महाजनांवर गोळ्या झाल्यानंतर प्रवीण महाजन घराबाहेर पडले. कोणाशी काहीच न बोलता, 15 मजले जिन्याने उतरत खाली आले. गाडी पार्किंगमध्येच सोडली. आणि टॅक्सीने पोलीस स्टेशनकडे निघाले. सकाळचे साडेआठ वाजले असतील. नाईट शिफ्टवर असलेले वरळी पोलीस स्टेशनचे कर्मचारी ड्युटी संपवून घरी जाण्याच्या तयारीत होते. तेवढ्यातच हातात पिस्तूल घेऊन प्रवीण महाजन शांतपणे चालत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी पिस्तूलासह सरेंडर केलं. "मी प्रमोद महाजनांवर गोळ्या झाडल्यात," त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मराठीत सांगितलं. ड्युटीवरील पोलिसांचा विश्वासच बसला नाही. कारण प्रवीण महाजन कोणालाच फारसे माहित नव्हते. प्रवीण महाजन यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी प्रमोद महाजनांच्या घरी धाव घेतली.
नक्की वाचा >> 'नवनीत राणांचा पराभव झाल्यावर मुसलमानांनी...', राज ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, 'कितीवेळ बाहेर...'
प्रमोद महाजन गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ सुरू झाली. गोपीनाथ मुंडेंनी त्याच इमारतीत रहाणारे डॉक्टर विजय बंग यांना फोन केला. 'इंडिया टू-डे'शी बोलताना डॉ. बंग म्हणाले होते, "मी पोहोचलो तेव्हा महाजन खुर्चीवर बसले होते. त्यांचा रक्तदाब खूप कमी होता. शरीरात रक्तस्राव सुरू झाला असावा." गोपीनाथ मुंडे आणि रेखा महाजन यांनी प्रमोद महाजनांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं. प्रमोद महाजन भाजपचे मोठे नेते होते. त्यामुळे डॅाक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. कोर्टात साक्ष देताना रेखा महाजन पुढे म्हणाल्या होत्या, "रुग्णालयात नेताना प्रमोद महाजन शुद्धीवर होते. ते गोपीनाथ मुंडे यांना म्हणाले, मी असं काय केलं होतं, की प्रवीणने माझ्यावर गोळ्या झाडल्या."
इथे वरळी पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी पोहोचण्यास सुरूवात झाली. पोलिसांनी प्रवीण महाजन यांनी गुन्ह्याची कबूली दिल्याचा दावा केला होता. तर वरळी पोलीस स्टेशनला छावणीचं स्वरूप आलं होतं. पोलीस स्टेशनबाहेर मोठ्या संख्येने रिपोर्टर आणि चॅनलच्या ओबी व्हॅन पोहोचल्या होत्या. प्रवीण महाजनांना अटक करून मध्य मुंबईतील भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी प्रवीण महाजन यांच्याविरोधात सेशन्स कोर्टात आरोपपत्र दाखल केलं.
मुंबई सेशन्स कोर्टाने 2007 मध्ये प्रवीण महाजन यांना प्रमोद महाजन हत्याप्रकरणी दोषी ठरवलं. त्यांना जन्मठेप सुनावण्यात आली. वरिष्ठ वकील उज्वल निकम प्रमोद महाजन खटल्यात विशेष सरकारी वकील होते. 'बीबीसी'शी बोलताना ते म्हणाले, "प्रवीण महाजन यांच्या मनात नेमकं काय होतं. हे कधीच कळू शकलं नाही." प्रमोद महाजन खटल्याच्या सुनावणीचा काही भाग इन-कॅमेरा करण्यात आला होता. प्रमोद महाजन यांच्या चारित्र्यावर आरोप केल्यामुळे हा खटला इन-कॅमेरा करण्यात आला होता.
नक्की वाचा >> Pawar Vs Pawar: अखेर अजित पवारांना 'ती' जाहिरात छापावीच लागली; म्हणाले, 'अंतिम निकालाच्या...'
14 दिवसांच्या फर्लोवर बाहेर आल्यानंतर प्रवीण महाजन यांनी काही प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली होती. 'डीएनए'च्या मुलाखतीत त्यांना तुम्ही प्रमोद महाजन यांची हत्या का केली? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या मुलाखतीत प्रवीण महाजन म्हणाले होते, "मी प्रमोदला मारलं नाही. हे घडलं. तुम्ही यावर विश्वास ठेऊ शकाल? मी याचा विचार करत नाही. तुम्हाला वाटेल की, ही घटना पुन्हा माझ्यासमोर येत राहील. पण मी याचा विचार करत नाही. काही गोष्टी न समजण्यापलीकडे असतात. हे सर्व फक्त 15 मिनिटात घडलं. माझ्या अनेक गोष्टी लक्षात आहेत. फक्त 22 एप्रिल 2006 चा दिवसच का? मला सर्व आठवतंय."
13 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर भाजप नेते प्रमोद महाजन यांची प्राणज्योत मालवली. मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रवीण महाजन आणि प्रमोद महाजन यांच्यात नेमकं काय झालं? हे कधीच पुढे आलं नाही. मात्र, प्रमोद महाजनांवर गोळ्या झाडण्याच्या सहा दिवस आधी, 15 एप्रिलला प्रवीण महाजनांनी प्रमोद महाजनांना एक मेसेज पाठवला होता - "अब याचना नहीं, रण होगा. जीवन विजय के साथ या फिर मरण होगा." भाजपचे स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांनी सेशन्स कोर्टात दिलेल्या साक्षीत, या मेसेजजबाबत माहिती दिली होती.