नवाब मलिकांनी अखेर दाखल केला उमेदवारी अर्ज, भाजपाच्या विरोधानंतरही अजित पवारांनी दिले एबी फॉर्म

Nawab Malik Files Nomination: नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले होते.   

शिवराज यादव | Updated: Oct 29, 2024, 03:41 PM IST
नवाब मलिकांनी अखेर दाखल केला उमेदवारी अर्ज, भाजपाच्या विरोधानंतरही अजित पवारांनी दिले एबी फॉर्म title=

Nawab Malik Files Nomination: नवाब मलिक (Nawab Malik) यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने अखेर त्यांना एबी फॉर्म दिला आहे. नवाब मलिक यांनी आज दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले होते. आपल्याला अद्याप पक्षाकडून एबी फॉर्म मिळालेला नाही. जर 3 वाजेपर्यंत एबी फॉर्म मिळाला नाही तर आपण अपक्ष लढणार असं नवाब मलिक यांनी जाहीर केलं होतं. अर्ज दाखल केल्यानंतर नवाब मलिक प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

"मी आज शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघातून राष्ट्रवीदी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यासह अपक्ष अर्जही दाखल केला आहे. एबी फॉर्म सादर करण्यासाठी मला तो प्राप्त झालेला नाही. मला अद्याप एबी फॉर्म मिळालेला नाही. 3 वाजेपर्यंत वाट पाहू. पक्षाने एबी फॉर्म पाठवला, तो वेळेत सादर झाला तर पक्षाकडून लढणार. जर तो वेळेत सादर झाला नाही तर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढेन. आमचे एजंट येथे थाबंले आहेत," असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. 

शिंदे समर्थक नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा मातोश्रीवर आले तर? राऊत म्हणाले, 'आम्ही त्यांना टेबलावर...'

 

"कोणाचा विरोध, कोणाचं समर्थन हा विषय नाही. लोकांच्या आग्रहामुळे मी येथे निवडणूक लढत आहे. आधी मी निवडणूक लढायचं नाही असं ठरवलं होतं. पण या मतदारसंघाची परिस्थिती चिंताजनक आहे. झुंडशाही, गुंडशाही, ड्रग्जचा कारभार, लहान मुलं ड्रग्ज घेत आहेत. तुम्ही लढल्याशिवाय येथील परिस्थिती बदलणार नाही असा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या आग्रहामुळे मी निवडणूक लढणार आहे. जर पक्षाची उमेदवारी नक्की झाली तर पक्षाच्या वतीने, अन्यथा अपक्ष लढणार," असं नवाब मलिक यांनी जाहीर केलं आहे. 

'उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, मात्र एकनाथ शिंदेंनी फसवलं'; 'या' आमदाराने सोडलं अन्न पाणी; म्हणतो 'मी आयुष्य...'

 

अजित पवार संकटाच्या वेळी माझ्या पाठीशी उभे राहिले. माझं कर्तव्य आहे की मी त्यांच्यासोबत उभं राहावं. पण काहीही परिस्थिती असली तरी मी लढणार आणि जिंकणार. रेकॉर्डब्रेक मतांनी मी जिंकेन. माझी मुलगी राष्ट्वादीकडून अणुशक्तीनगरमध्ये लढत आहे. मी येथे लढत आहे. कोण समोर आहे याची चिंता नाही. दोन्ही ठिकाणी बहुमताने निवडून येऊ, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

समीर वानखेडे निवडणूक लढणार असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता मलिक म्हणाले, "जर ते लढत असतील तर जनतेला त्यांचा फर्जीवाडा माहिती आहे. मी जे आरोप केले होते ते सर्व सत्य बोलत होते. सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे".