Uddhav Thackeray Change Candidate: उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने (Shivsena) चोपड्यातून जाहीर केलेला उमेदवार बदलला आहे. राजू तडवी (Raju Tadvi) यांच्याऐवजी प्रभाकर सोनवणे (Prabhakar Sonavne) यांना संधी देण्यात आली आहे. भाजपाच्या प्रभाकर सोनवणे यांचा आज ठाकरे गटात पक्ष प्रवेश झाला असून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याअगोदर चोपडा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजू तडवी यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यामुळे चोपड्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रभाकर सोनवणे विरुद्ध एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत सोनवणे यांच्यात लढत होणार आहे.
चोपडा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंकडून राजू तडवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा एक दिवस बाकी असताना ही उमेदवारी प्रभाकर सोनवणे यांना देण्यात आली. यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे. या मतदारसंघात मागील काळात लता सोनावणे आमदार होत्या. आता त्यांचे पती चंद्रकांत सोनवणे यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात प्रभाकर सोनवणे हे कशी लढत देतात. याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
मुंबई महापालिकेचे माजी शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून चोपडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवली होती. उद्धव ठाकरे यांनी राजू तडवी यांना एबी फॉर्मही दिला होता. काही दिवसांपूर्वीच राजू तडवी यांनी मुंबई महापालिका शिक्षण अधिकारी पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती आणि आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. पण आता उमेदवार बदलल्याने सगळं गणितच बदललं आहे.