Sanjay Raut: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. भाजप, शिवसेना आणि मनसेने उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. आता महाविकास आघाडीची यादी कधी जाहीर होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. अशातच माहिम मतदारसंघात शिंदेंची शिवसेना आणि मनसेत अटीतटीची लढत होणार आहे. अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर रिंगणात आहेत. माहिममध्ये आता शिवसेना उमेदवार देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत संजय राऊत यांनी स्पष्टचं म्हटलं आहे.
वरळीत मनसेचा उमेदवार देण्यात आला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष उमेदवार देण्याचा प्रयत्न करतो. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. अनेक पक्षांना वर्षानूवर्षे निवडणुक लढवूनसुद्धा यश प्राप्त होत नाही त्या पक्षांनीसुद्धा निवडणुक लढवू नये असं म्हणणार नाही. तरुणांचं राजकारणात स्वागत करावं अशी आमची संस्कृती आहे. दादर-माहिम मतदारसंघात शिवसेनेची स्थापना झाली. जिथे स्थापना झाली तिथे शिवसेना लढणार नाही असं होणार नाही. आम्ही सौदा करत नाही आम्ही आव्हान स्वीकारतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीचा मोठा संसार आहे. काल रात्री जागावाटपाचं काम जवळपास 99 टक्के पूर्ण झालं आहे. इतर लोकांनी ज्या याद्या जाहीर केल्यात त्यांना विरोधी पक्षात बसायचं आहे. त्यांना फार घाई नाहीये. आम्हाला सरकार बनवायचं आहे. आम्ही उद्याचे सत्ताधारी आहे. प्रत्येक मतदारसंघ मोजून मापून आह्मी जागावाटप करत आहोत. येणार्या सत्ताधाऱ्यांना जितका वेळ लागतो तितका वेळ आम्हाला लागला. आज संध्याकाळपर्यंत तिन्ही पक्षांचे नेते याबाबत जाहीर करतील, असं राऊत म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. सरकारचं नेतृत्व कोण करणार हे मी तुम्हाला 23 तारखेला 10.30 वाजता सांगणार. ज्यांना वर्षानूवर्ष उमेदवारी दिली, रंकाचे राव केले ते रावसाहेब सोडून गेले. इच्छुकांची संख्या जास्त आहे म्हणजे आम्ही सत्तेवर येतोय. तो एक ट्रेंड आहे. आज 12.30 वाजता श्रीगोंद्याचे प्रमुख नेतृत्व हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. कोल्हापूरचे केपी पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहे. याचाच अर्थ महाविकास आघाडी मजबूत आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंची शिवसेना मोठा उमेदवार देणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे, मोठा उमेदवार म्हणजे कोण ट्रम्प किंवा पुतीनला आणणार आहेत का. का प्रिन्स चार्ल्सला आणणार आहेत. यापेक्षा कोणी मोठा उमेदवार असतील तर मला सांग मी अज्ञानी माणूस आहे. तसंच, वरळीत आदित्य ठाकरे मागच्या निवडणुकीपेक्षाही चांगल्या मताने निवडून येतील, आम्हाला वरळीची चिंता नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.