दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लॉकडाऊनचा हा ४ था टप्पा उद्यापासून सुरू होणार असून तो ३१ मे पर्यंत असणार आहे. राज्य सरकारने जारी केलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज १७ मे रोजी संपत आहे.
राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा लॉकडाऊन वाढवण्याबाबत या आठवड्यात पार पडलेल्या बैठकीत चर्चा झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित होते. त्यानुसार हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे.
राज्यात २२ मार्च रोजी पहिला लॉकडाऊनचा टप्पा घोषित करण्यात आला. हा पहिला टप्पा १४ एप्रिलला संपला, दुसरा लॉकडाऊन १४ एप्रिल ते ३ मे असा होता, तर सध्या सुरू असलेला लॉकडाऊन ३ मे रोजी सुरू झाला असून त्याचा कालावधी १७ मे पर्यंत आहे. १७ मे नंतर लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन निर्णय घ्यावा अशा सूचना पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना केल्या होत्या.
राज्यात लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढणार म्हणजेच २२ मार्च ते ३१ मे असे ७१ दिवस लॉकडाऊनचे होतात. एवढा काळ राज्याचे अर्थचक्रही थांबले आहे, त्यामुळे राज्याची वाटचाल आर्थिक अडचणीच्या दिशेने सुरू आहे. कोरोनाशी मुकाबला करताना या थांबलेल्या अर्थचक्राला गती देणे गरजेचे असल्याने १७ मे नंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देणे गरजेचे आहे.
चौथ्या लॉकडाऊनमध्ये अनेक बाबतीत शिथिलता दिली जाणार आहे. विशेषतः ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योग सुरू करण्याबाबत तसंच इतर व्यवहार सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. रेड झोनमध्ये कॅन्टोन्मेंट विभाग सोडून इतर भागातील व्यवहारही कदाचित काही प्रमाणात सुरू होऊ शकतात. याबाबत सरकार लवकरच सविस्तर आदेश जारी करणार आहे. या आदेशात लॉकडाऊनमध्ये किती प्रमाणात आणि कशाला शिथिलता दिली जाईल याबाबत स्पष्टता असेल.