प्रताप नाईक (प्रतिनिधी) कोल्हापूर : विधानसभा निवडणुका झाल्या असून आता येत्या काही महिन्यात महापालिकांसह स्थानिक निवडणुका जाहीर होऊ शकतात. तेव्हा राज्यात सत्तेत आणि विरोधात असलेले नेते स्थानिक पातळीवर एकमेकांशी हात मिळवू शकतात. त्यात आता कोल्हापूरच्या राजकारणातील मित्रांची जोडी असलेल्या मुश्रीफ आणि सतेज पाटलांचं काय होणार याची चर्चा राजकीय विश्वात रंगू लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची राजकारणातली मैत्री कोल्हापुरात सर्वश्रृत आहे. एकेकाळी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर महाडीक गटाचा असलेला वरचष्मा दोघांनी हळूहळू मोडीत काढला. मुश्रीफ आणि बंटी पाटील यांनी एकत्र येत कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघासारख्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमधून महाडीकांचं राजकारण हद्दपार केलं आणि या जोडगोळीनं पकड मिळवली. पण राज्यात राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष भाजपसोबत गेल्यांनतर मुश्रीफ आणि बंटी पाटलांत तसा दुरावा आला. त्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढली तर दोघांमधला दुरावा अजून वाढेल. मात्र यावर मंत्री हसन मुश्रीफांनी सावध भूमिका मांडली आहे.
मुश्रीफांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सत्तेत असणाऱ्या भाजप शिवसेना, राष्ट्रवादी, एकत्र लढण्याचा प्रयत्न करू असं वक्तव्य केलं आहे. पण मित्रपक्षांत इच्छुकांची संख्या जास्त असेल तर मैत्रीपूर्ण लढत करू असाही सुतवाच केलाय. यावरूनच मुश्रीफ आणि सतेज पाटील वेगवेगळे लढले तरी ते एकमेकांना पूरक राजकारण निर्माण करतील असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
देशात आणि राज्यात भाजपप्रणीत महायुतीची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवरचं राजकारण आपल्याच हातात असावं असे प्रत्येक नेत्याला वाटतं. त्यामुळं स्थानिक मैत्रीही जपली जाते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वजन कायम ठेवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांची जोड गोळी आगामी स्थानिक निवडणुकीत अप्रत्यक्ष एकत्रच राहील असं दिसतंय. त्यामुळे हसन मुश्रीफ आणि बंटी पाटलांची ही दोस्ती तुटायची नाय असंच कोल्हापूरकरांना वाटत आहे.