टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव न लिहिल्यास कारवाई होणार? ICC ने वाढवलं BCCI चं टेन्शन

Champions Trophy 2025: बीसीसीआयला पाकिस्तानचं नाव टीम इंडियाच्या जर्सीवर  लिहायचं नाही. परंतु या निर्णयामुळे आयसीसी बीसीसीआयवर कारवाई करू शकते. 

पुजा पवार | Updated: Jan 22, 2025, 06:48 PM IST
टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव न लिहिल्यास कारवाई होणार? ICC ने वाढवलं BCCI चं टेन्शन title=
(Photo Credit : Social Media)

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) सुरु होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक असताना आता एक नवा वाद समोर आला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआय (BCCI) टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव लिहिण्यास तयार नाही. स्पर्धेच्या लोगो सोबत यजमान स्पर्धेचे आयोजन ज्या देशात होतंय त्या देशाचे नाव लिहिणे महत्वाचे असते. परंतु भारत चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्व सामने दुबईत खेळणार आहेत. अशात बीसीसीआयला पाकिस्तानचं नाव टीम इंडियाच्या जर्सीवर (Team India Jersey) लिहायचं नाही. परंतु या निर्णयामुळे आयसीसी बीसीसीआयवर कारवाई करू शकते. 

आयसीसीच्या स्पर्धांचे यजमानपद ज्या देशाकडे असते त्या देशाचे नाव स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना त्यांच्या जर्सीवर लिहावे लागते. मात्र बीसीसीआय टीम इंडियाच्या जर्सीवर चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान असणाऱ्या पाकिस्तानचं नाव लिहिणार नाही अशी माहिती समोर येत आहे. इत्यादी कारणांमुळे पीसीबीचे अधिकारी बीसीसीआयवर नाराज असून त्यांनी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डावर खेळात राजकारण आणत असल्याचे आरोप केले आहेत. याबाबत पीसीबीने आयसीसीला देखील मध्यस्थी करण्याची मागणी केली आहे. मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत असलेल्या माहितीनुसार आयसीसीने या वादावर निर्णय घेण्याचं ठरवलं असून त्यांनी बीसीसीआयला यजमान देशाचे नाव जर्सीवर लिहिण्यास सांगितले आहे. 

आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने ए-स्पोर्ट्सला सांगितले की, "प्रत्येक संघाची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या जर्सीवर टूर्नामेंटचा लोगो प्रिंट करेल. सर्व संघांना या नियमांचे पालन करावे लागेल". 

हेही वाचा : रिंकू सिंहने बांधला 3.5 कोटींचा आलिशान बंगला, पण आई वडील अजूनही जुन्याच घरात का राहतायत?

आयसीसी करणार कारवाई : 

आयसीसीने असेही म्हटले आहे की, यजमान देश पाकिस्तानचे नाव असलेला चॅम्पियन्स ट्रॉफीचा लोगो खेळाडूंच्या किटवर आढळला नाही, तर भारतीय संघावर कठोर कारवाई केली जाऊ शकते. आयसीसीच्या नियमांनुसार, सामने कुठेही खेळले जात असले तरी संघांना जर्सीवर यजमान देशाचे नाव लिहावे लागेल. आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयला टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचे लिहिण्यास तयार नाही अपरंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय बोर्डाकडून अशी कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे म्हटले आहे. 

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला जाणार नाही : 

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद पाकिस्तानातील प्रमुख शहरात पार पडणार आहे. तसेच ट्रॉफीसोबत सर्व कर्णधारांचे फोटोशूट देखील पार पडेल. याकरता पीसीबीकडून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला आमंत्रण देण्यात आले होते. मात्र या पत्रकार परिषद आणि फोटोशूटसाठी बीसीसीआय टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला पाकिस्तानात पाठवण्यास तयार नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे.