'कधीही आणि कुठेही....', सुरेश धस यांच्या जाहीर आव्हानाला धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर, 'हजारो जणांनी...'

धनंजय मुंडेंनी कुठेही आणि कधीही चर्चा करावी आपण तयार असल्याचं आव्हान सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना दिलं आहे

शिवराज यादव | Updated: Jan 22, 2025, 08:45 PM IST
'कधीही आणि कुठेही....', सुरेश धस यांच्या जाहीर आव्हानाला धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर, 'हजारो जणांनी...' title=

पीकविम्यात तब्बल 5 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप  सुरेश धस यांनी पुन्हा एकदा केला आहे. धनंजय मुंडेंनी कुठेही आणि कधीही चर्चा करावी आपण तयार असल्याचं आव्हान सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना दिलं आहे. त्यामुळे धस यांचं चॅलेंज मुंडे स्वीकारणार का हेच पाहावं लागणार आहे.

पीकविमा घोटाळ्याप्रकरणी सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आपल्याच माजी कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले. पीक विमा घोटाळा पाच हजार कोटींचा असल्याचा आरोप सुरेश धसांनी केला आहे. पीक विमा प्रकरण निकाली लावण्यासाठी सुरेश धसांनी कंबर कसली आहे. सुरेश धसांनी केलेल्या आरोपांना आता धनंजय मुंडेंनीही प्रत्युत्तर दिलं असून पीक विम्याचा हजारो शेतकऱ्यांनी फायदा घेतल्याचा दावा केला आहे. पीक विम्याच्या माध्यमातून खऱ्या शेतकऱ्यांना 11 हजार कोटी रुपये वाटल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केला आहे. 

धनंजय मुंडेंचा दावा सुरेश धसांनी फेटाळला आहे. घोटाळा कसा झाला हे पुराव्यासह दाखवणार असून त्यांनी खुल्या चर्चेसाठी येण्याचं चॅलेंजच धस यांनी मुंडेंना दिलं आहे.  पीकविमा घोटाळ्याचं कृषिमंत्रीच समर्थन करतात. मग घोटाळ्याची चौकशी कशी होणार असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. 

पीकविमा घोटाळ्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगत असताना आता विरोधकांनीही  सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. पीकविमा घोटाळ्याचं केंद्र बीड असून सूत्रधारांवरक कारवाईची मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

पीकविमा घोटाळ्यावरून धनंजय मुंडेंची चौफेर कोंडी होताना दिसत आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर सरकार धनंजय मुंडेंवर कारवाईबाबत काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.