कोठडी संपली, वाल्मिक कराडच्या चौकशीत पोलिसांच्या हाती काय लागलं?

Valmik Karad: आरोपी वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

Pravin Dabholkar | Updated: Jan 22, 2025, 09:22 PM IST
कोठडी संपली, वाल्मिक कराडच्या चौकशीत पोलिसांच्या हाती काय लागलं? title=
वाल्मिक कराड

Valmik Karad: वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. खंडणी, हत्येप्रकरणी त्याला  कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली. 5 फेब्रुवारीपर्यंत वाल्मिक कराड याचा मुक्काम बीड कारागृहात असणार आहे. दरम्यान आतापर्यंतच्या वाल्मिकच्या चौकशीत पोलिसांच्या हाती काय लागलंय, हा प्रश्न आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. हत्या प्रकरणात वाल्मिक कराड एसआयटी कोठडीत होता. 29 नोव्हेंबरचा वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीचा व्हिडिओ बाहेर आला होता. या व्हिडिओच्या चौकशीसाठी त्याची कोठडी मागितली जाईल असा अंदाज होता. 

वाल्मिकला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयासमोर हजर केलं.विशेष मकोका न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्यासमोर वाल्मिकला हजर केलं.11 वाजून 35 मिनिटांनी SITच्या अधिका-यांनी आपलं म्हणणं न्यायालयात लेखी स्वरुपात सादर केलं. वाल्मिकला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. 11 वाजून 40 मिनिटांनी वाल्मिकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अवघ्या पाच मिनिटांत न्यायालयीन सुनावणी संपली. वाल्मिकची SITतून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. वाल्मिकचा पुढचा मुक्काम बीड कारागृहात असणार आहे. वाल्मिकची पुन्हा पोलीस कोठडी होऊ शकते असं सरकारी वकिलांनी सांगितलंय.

वाल्मिक कराडला एवढ्या लवकर न्यायालयीन कोठडी कशी दिली गेली असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय. वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं मनोज जरांगे पाटीलही अस्वस्थ झाले. आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली पण त्यांना जामीन मिळता कामा नये अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलीये.

आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये अशी मागणी धनंजय देशमुखांनी केलीये. जेलमध्ये असतानाच हा खटला उभा राहिला पाहिजे असंही धनंजय देशमुख म्हणालेत.
वाल्मिक कराडचा मुक्काम बीड जेलमध्ये असणार आहे. पण जेव्हा कृष्णा आंधळे सापडेल किंवा मोठे पुरावे हाती लागतील तेव्हा वाल्मिक पुन्हा चौकशीच्या फे-यात सापडण्याची शक्यता आहे.