Krishna Andhale: सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला बीड पोलिसांकडून वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आलंय..त्याच्यावर माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केलंय..पोलिसांवर दुसऱ्यांदा आंधळेवर बक्षीस जाहीर करण्याची नामुष्की ओढवलीये.. पोलिसांना आंधळे का सापडत नाही असा प्रश्न बीड जिल्ह्यातल्या जनतेकडून विचारला जातोय.
संतोष देशमुखांच्या हत्येतला आरोपी कृष्णा आंधळे गेला कुठं असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. देशातील सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र पोलिसांना कृष्णा आंधळे अजूनही सापडलेला नाही. कृष्णा आंधळेच्या मागावर फक्त परळी पोलीसच नाहीत तर सीआयडी आणि एसआयटीही कृष्णा आंधळेचा शोध घेतायेत. कृष्णा आंधळे हा सुदर्शन घुलेसोबत फरार होता. पुण्यात जेव्हा सुदर्शन घुले सापडला तेव्हा पोलिसांना कृष्णा आंधळेनं गुंगारा दिला. कृष्णा आंधळे सापडला नसल्यानं पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्यावर बक्षीस जाहीर केलं होतं. तरीही कृष्णाची माहिती मिळाली नाही. त्यामुळं पोलिसांनी दुसऱ्यांदा त्याच्यावर बक्षीस जाहीर केलंय.
कृष्णा आंधळे यानं पकडलं जाण्याच्या भीतीनं सर्वांशीच संपर्क तोडल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. कृष्णा आंधळे हा चहा बिस्कीटं खाऊन दिवस काढू शकतो. शिवाय फरार असताना त्यानं एका मंदिराचा आश्रय घेतल्याचीही माहिती आहे. त्यामुळं आताही तो असाच कुठंतरी लपला असावा असा पोलिसांना संशय आहे.
सैफ अली खानचा हल्लेखोर अवघ्या काही तासांत पकडला जातोय. पण वाल्मिक कराडचा साथीदार 43 दिवसांपासून कसा सापडत नाही असा सवाल विचारला जातोय.
संतोष देशमुखांचा एक मारेकरी 43 दिवसानंतरही सापडत नाही. पोलीस फक्त बक्षीस जाहीर करुन स्वतःची जबाबदारी झटकू पाहयातत का असा प्रश्न आता परळीकर विचारु लागलेत.