संजय पवारसह दीपक भातुसे, झी मीडिया, सोलापूर : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सरकारकडून बक्षिसी देण्याची तयारी सुरू आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये अनेक साखर कारखानदार आहेत. या नेत्यांच्या अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना कर्जहमी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीतले अनेक दिग्गज भाजपामध्ये गेलेत तर काही जाण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात पुन्हा भाजपाचंच सरकार येणार, काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार नाही याची खात्री असल्याने हे सर्वजण सत्तेतून मिळणारे फायदा उचलण्यासाठी भाजपाच्या दारात जात आहेत. याची प्रचिती आता यायला सुरुवात झाली.
भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये साखर कारखानदारांचाही समावेश आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतून प्रवेश केलेल्या आणि करणाऱ्यांना भाजपाच्या गोटात सामील झाल्याचं बक्षीस मिळणार आहे. अशा नेत्यांच्या सहा साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठण, कर्जाला थकहमी, तसचं ऊस कराची माफी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सहकार मंत्र्यांनी याला दुजोरा दिला असून त्याचं समर्थन केलंय.
लोकसभा निवडणुकीआधी सरकारने भाजपा नेत्यांच्या १५ सहकारी साखर कारखान्यांना अशा प्रकारे मदत केली होती. विशेष म्हणजे या कारखान्यांनी सरकारकडून यापूर्वी भागभांडवलाच्या माध्यमातून घेतलेली रक्कम परत केली नसतानाही भाजपातील नेते नाराज होऊ नयेत म्हणून सरकारने हे पाऊल उचललं होतं. त्यात पंकजा मुंडे, रावसाहेब दावने, संजयकाका पाटील अशा दिग्गज नेत्यांचा समावेश होता. तर आता काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्यांनाच अशी बक्षिसी दिली जाणार आहे.