Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह 9 जणांनी सरकारमध्ये सहभागी होत शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) कारवाईचं पाऊल उचललं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याची माहिती दिली होती. दरम्यान, आता यावर राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी प्रतिक्रिया दिली असून काय कारवाई केली जाईल याची माहिती दिली आहे.
"महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील 9 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. आज मी ती वाचून, त्याचा अभ्यास करुन य़ोग्य निर्णय घेईन," अशी माहिती राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. तसंच अजित पवार यांच्याकडे नेमक्या किती आमदारांचा पाठिंबा आहे याच्याबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं आहे.
भाजपाचा हुकमी एक्का थेट केंद्रात? फडणवीसांना मोठी संधी मिळण्याची शक्यता; मोदींच्या निर्णयाकडे लक्ष
"सभागृहात विरोधी पक्षनेत्याची निवड केल्यानंत त्याची दखल घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे असते. अधिकारांचा वापर करताना अध्यक्षांना नियमांचं पालन करत, संवैधानिक तरतुदी यांच्यानुसार योग्य निर्णय घ्यायचा असतो," असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. योग्य अभ्यास केल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही वेळातच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतरही काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे यांच्यासह इतरही नेत्यांचा समावेश आहे. या आमदारांविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसने कायदेशीर कारवाईचं पाऊल उचललं आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 सदस्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांना कोणतीही कल्पना न देता पक्षाच्या धोरणाच्या आणि पक्षाच्या हिताच्या विरोधात राजभवनात जाऊन शपथ घेतली आहे. त्यांची ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पूर्णपणे अंधारात ठेवून ही कृती करण्यात आली आहे. ही कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे स्टेट डेसिप्लिन कमिटीच्या सल्ल्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्षांकडे दाखल करण्यात आली आहे,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.