Eknath Khadse Death Threat : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरु असताना राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं खळबळजनक वृत्त नुकतंच समोर आलं. खडसे यांना चार वेगवेगळ्या मोबाईलवरुन धमकीचे फोन आले.
कथित स्वरुपात दाऊद आणि छोटा शकीलकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. यासंदर्भात एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. 15 आणि 16 एप्रिलला हे फोन आल्याची माहिती खडसेंनी तक्रारीत दिल्याचं कळत आहे.
'परवापासून चार-पाच फोनवरून दाऊद, छोटा शकीलचं नाव घेत धमकीचे फोन मला आले. काही फोन अमेरिकेहून आले, काही उत्तर प्रदेशातून. पण हा खोडसाळपणा असावा असं सुरुवातीला मला वाटलं, पण, अमेरिकेहून आलेला फोन पाहता या प्रकरणाचं गांभीर्य जाणत आपण पोलिसांत त्याबाबतटी तक्रार दाखल केली. याआधी दाऊदच्या पत्नीशी माझं संभाषण झालं असं रेकॉर्डींग प्रक्षेपित करण्यात आलं होतं. एका व्यक्तीनं खोडसाळपणा करत संगणत तंत्राच्या माध्यमातून हे सर्व केल्याचं त्यानंतर तपासातून उघड झालं होतं. हा प्रकारही असाच असावा असं मला सुरुवातीला वाटलं', असं एकनाथ खडसे म्हणाले.
निवडणुकीच्या धामधुमीत आलेला फोन पाहता काळजीचं पाऊल म्हणून आता पोलिसांमध्ये हे प्रकरण पोहोचलं असून, आता त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल अशी अपेक्षा असल्याचा विश्वास खडसेंनी व्यक्त केला. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपण अद्याप राज्याच्या गृहमंत्र्यांकडे या धमकी प्रकरणाची तक्रार केली नसल्याचं स्पष्ट केलं.