विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप पक्ष सोडून महाविकास आघाडीत गेलेल्या आणि निवडणुकीत पराभव पदरी पडलेल्या नेत्यांना आता पुन्हा एकदा घरवापसीचे वेध लागलेत. मात्र त्या नेत्यांना पक्षात घेतल्यास स्थानिक नेते आणि मित्रपक्ष नाराज होतील या कारणाने त्यांना वेटींगवर ठेवण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सोडलेले अनेक नेते या वेटिंग लिस्टमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. जाणून घेऊयात सविस्तर
विधानसभेला पक्ष सोडलेले नेते पुन्हा रांगेत
महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपतील अनेक नेत्यांनी तिकीट मिळणार नसल्याने पक्षाला रामराम करत महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता या नेत्यांना पुन्हा एकदा भाजपामध्ये घरवापसी करण्याचे वेध लागलेत. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चित्र बदललंय. भाजप सोडलेल्या अनेक नेत्यांच्या पदरी पराभव आलाय. त्यामुळे असे अनेक नेते भाजपमध्ये घरपावसी करण्याची शक्यता आहे. काही नेत्यांनी तर भाजप नेतृत्वाशी संपर्क देखील साधला असल्याचं बोललं जातंय. समरजित घाटगे, संजयकाका पाटील, राजन तेली, बाळ माने हे नेते भाजपमध्ये घरवापसी करण्यासाठी वेटींगवर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.
भाजपमधील इनकमिंगबद्दल काय म्हणाले बावनकुळे?
सध्या शिर्डीमध्ये भाजपचे 'घर चलो अभियान' सुरु आहे. यावेळी तिथे उपस्थित असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपची साथ सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप पक्ष सोडून गेलेल्या कोणत्याही नेत्याला पुन्हा पक्षात घेताना तेथील स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच पक्ष प्रवेश केला जाईल. कारण महायुतीत सध्या कोणताही तणाव नाहीये. महायुती महत्वाची आहे. त्यामुळे सर्व निर्णय नेतृत्वाला विश्वासात घेऊन घेतले जातील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळालंय. तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झालाय. त्यामुळे पुढील पाच वर्षात विरोधात बसण्यापेक्षा भाजपमध्ये घरवापसी करण्याकडे या नेत्यांचा कल आहे. मात्र भाजपने काहीसं आस्ते कदम घेत घरवापसी करणासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांना वेटींगवर ठेवलंय.