Maharashtra Politics : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरुन एकीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यावर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे अदानींविरोधात मत काही वेगळंच असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उद्योगपती गौतम अदानी यांचं पुन्हा एकदा तोंडभरुन कौतुक केलं आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथे नवीन तंत्रज्ञान केंद्राच्या उभारणीसाठी आर्थिक मदत केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी उद्योगपती गौतम अदानी यांचे आभार मानले आणि त्यांचे कौतुकही केले.
बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकी विभागातील रोबोटिक लॅबच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शरद पवार यांनी गौतम अदांनींचे आभार मानले आहेत. या कार्यक्रमाला फिनोलेक्स जे पॉवर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष दीपक छाब्रिया देखील उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठान संस्थेने नवीन प्रकल्प हाती घेतला आहे. तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. तसेच पुढे जाण्यासाठी हे बदल स्वीकारण्यास तयार असणारा गट तयार करणे अत्यंत आवश्यक आहे, असे शरद पवार म्हणाले.
"आम्ही भारतातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे पहिले केंद्र बांधत आहोत आणि त्याचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पासाठी 25 कोटी रुपये खर्च येणार आहे. 25 कोटी रुपयांची व्यवस्था करून आम्ही या कामात उडी घेतली. सुदैवाने यात मदत करण्यासाठी आमच्या भागीदारांनी ताबडतोब पाठिंबा दिला. पहिली सिफोटेक जी देशातील बांधकाम क्षेत्रातील सर्वात महत्वाची कंपनी आहे. त्यांनी या प्रकल्पासाठी 10 कोटी रुपयांची मदत करण्याचे ठरवले आहे. मी त्यांचे खूप आभार मानू इच्छितो. वर यावेळी गौतम अदानी यांचे नाव घ्यावे लागेल, त्यांनी संस्थेला 25 कोटी रुपयांचा चेक पाठवला आहे, या दोघांच्या सहकार्याने आज या ठिकाणी हे दोन्ही प्रकल्प उभारत आहोत आणि कामही सुरू झाले आहे," असेही शरद पवार म्हणाले.
दरम्यान, अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण उघडकीस आल्यानंतर विरोधी पक्षांनी याची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यावेळीही शरद पवारांनी अदानींना पाठिंबा दिला होता. दुसरीकडे राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसकडून अदानींना जोरदार विरोध झाला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात मोर्चा काढला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी अदानींवर हल्लाबोल केला होता. अशातच आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी अदानींचे कौतुक केले आहे.