सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिल्यानंतर शरद पवार गटाला मोठा धक्का बसला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी हे पक्षचिन्ह बहाल केले. नुकतेच शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आलं आहे. दुसरीकडे शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या नेत्यांना लक्ष्य केलं जात आहे.
अशातच अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील पुण्याच्या आंबेगाव येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना शरद पवार गटाच्या रोषाला सामोरं जावं लागलं. वळसे पाटील यांचे भाषणं सुरू असतानाच उपस्थित नागरिकांकडून शरद पवार झिंदाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी, जेवढं प्रेम तुमचं शरद पवार साहेबांवर आहे तेवढंच प्रेम माझं देखील आहे. मी तर 40 वर्ष त्यांच्या सोबत काम केलं आहे.पण काही राजकीय परिस्थिती असते ज्यामुळे असे निर्णय घ्यावे लागतात, असे म्हटलं. हा काही राजकीय व्यासपीठ नाही आणि मी काही त्यावर बोलणार ही नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.
आंबेगाव येथील शिरूर तालुक्यातल्या पाबळ या गावात ते बैलगाडा शर्यतीसाठी वळसे पाटील यांनी हजेरी लावली होती. बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रम संपल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी भाषण सुरू केलं. कालवा समितीच्या पाणी प्रश्न संदर्भात वळसे पाटील बोलत होते. पालकमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पाणीप्रश्न सोडवू असं आश्वासन वळसे पाटील यांनी दिलं. मात्र त्याचवेळी लोकांनी शरद पवार जिंदाबादच्या घोषणा द्यायला सुरूवात केली.
काय म्हणाले दिलीप वळसे पाटील?
"तुमचं जेवढं प्रेम शरद पवार साहेबांवर आहे, तेवढच प्रेम माझं पण आहे. मी गेले 40 वर्ष शरद पवार यांच्या सोबत राहिलेलं आहे. पण काही राजकीय प्रश्न असतात म्हणून निर्णय घ्यावा लागतो. मला त्याबद्दल बोलायचे नाही. ते आता मी इथे बोलत नाही. राजकीय सभेत राजकीय बोलू. पण पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात मार्ग कसा काढायचा याचा निर्णय घेऊ," असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.