पुणेः स्वतःवर विश्वास असेल आणि मनात जिद्द असेल तर अनेक अडचणींचा सामना करत व्यक्ती ध्येय गाठतोच. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भाऊसाहेब नवले यांनीही एक धाडसी पाऊल उचलत स्वतःचे स्वप्न पूर्ण करुन दाखवले आहे. कठिण परिस्तीतीत त्यांनी आज कोटींचा व्यवसाय उभारला आहे. करोनामुळं गेल्या दोन वर्षांत अनेक व्यवहार ठप्प पडले होते. यात अनेक जणांचे लाखोंचे नुकसान झाले. तर काहींना नोकरीदेखील गमवावी लागली. लॉकडाऊनच्या काळात अनेकांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. या परिस्थितीत भाऊसाहेब नवले यांनी महिना 2.50 लाख रुपयांची नोकरी सोडून काहीतरी वेगळं करायचा निर्णय घेतला. नवले यांनी स्वतःचा व्यवसाय उभारायचे ठरवले. आज नवले यांचा टर्नओव्हर कोटींमध्ये आहे.
मावळ तालुक्यातील 50 वर्षीय भाऊसाहेब नवले परदेशातील 2.50 लाखांची नोकरी सोडून आपल्या मायदेशी परतले. इथे येऊन त्यांना नर्सरीचा व्यवसाय उभारला. या व्यवसायातून आज त्याचा टर्नओव्हर जवळपास प्रत्येकवर्षी अडीच कोटी इतका आहे. वयाच्या ५०व्या वर्षी हा धोका पक्तरुन त्यांनी वैभव उभं केलं आहे. त्यांची ही कहाणी सर्वांसाठी प्रेरणा देणारी आहे.
भाऊसाहेब नवले हे B.Sc अॅग्रीकल्चर आहेत. शिक्षणानंतर त्यांनी सुमारे 25 वर्षे काम केले. त्यांनी इथिओपिया देशात अडीच लाख पगारावर काम केले. पण आपल्याच देशात राहून आपण काय करू शकतो, या विचाराने ते नेहमी विचारात असायचे. अखेरीस त्यांनी 25 वर्षांची नोकरी सोडली आणि आपल्या मायदेशी परतले. इथे येऊन महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात ग्रीन अँड ब्लूम्स नर्सरी सुरू केली.
1995 ते 2020 पर्यंत जवळपास 25 वर्षे काम केले. त्यापैकी दहा वर्षे त्यांनी इथिओपिया देशातील पॉलिहाऊसमध्ये गुलाब उत्पादनाचा अनुभवही घेतला आहे. तेथून ते आपल्या मायदेशी परतले आणि येथील नर्सरीत काम केले.
वयाच्या ५० व्या वर्षी भाऊसाहेबांनी करोनाला संधी समजून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. जिथे लोक नोकरीसाठी धडपडत होते तिथे त्यांनी मंदीच्या काळात संधी शोधत इनडोअर पॉट-प्लांट नर्सरीचा व्यवसाय सुरू केला. भाऊसाहेब नवले यांनी 27 युनिटमध्ये सुरू केलेला व्यवसाय आता एक एकरावर पसरला आहे. त्यांची झाडे देशभर विकली जातात. भाऊसाहेबांनी सुरू केलेल्या या रोपवाटिकेत शेकडो प्रकारची झाडे लावली जातात.
देशातील तीनशे लहान-मोठ्या रोपवाटिका त्यांच्याकडून रोपे खरेदी करतात. त्यांनी सुरू केलेल्या रोपवाटिका व्यवसायामुळे 15 हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे त्यांचे जीवन सुसह्य झाले आहे. भाऊसाहेब नवले यांनी वयाच्या पन्नाशीत घेतलेली जोखीम निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. जर एखाद्या व्यक्तीला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. भाऊसाहेब नवले यांनी तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.