योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : गेल्या पाच दिवसांपासून मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. धुळे, नंदुरबार नंतर शनिवारी त्यांनी अहमदनगरमधे कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर अमित ठाकरे हे मुंबईच्या दिशेने येत होते. मात्र यावेळी एक मोठी घटना घडली आहे. मध्यरात्री समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) टोलनाक्यावर (Toll Plaza) मनसे नेते अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याने मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. अमित ठाकरे यांची गाडी अडवल्याने मनसे कार्यकर्त्यांनी थेट टोलनाकाच फोडला आहे.
रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा या ठिकाणी असलेला बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा टोल नाका मनसे नाशिक शहर अध्यक्ष दिलीप दातीर यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी फोडला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे समृद्धी महामार्गाद्वारे मुंबईच्या दिशेने जात असताना गोंदे टोल नाक्याजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली होती. याच गोष्टीचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी हा टोल नाका फोडला आहे.
राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांना टोलनाक्यावर अर्धा तास थांबवल्यानंतर संतप्त झालेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केल्याचे समोर आले आहे. या तोडफोडीत संपूर्ण समृद्धी टोल नाक्याचे नुकसान झाले. 22 जुलै रोजी सायंकाळी अमित ठाकरे अहमदनगरहून सिन्नरच्या दिशेने जात होते. समृद्धी महामार्गच्या सिन्नर टोल प्लाझा येथे अमित ठाकरे यांचा ताफा सुमारे अर्धा तास थांबला होता. यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री टोलनाक्याची तोडफोड केली.
#samruddhiexpressway #TollPlaza | अमित ठाकरेंची गाडी अडवली म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी फोडला समृद्धी महामार्गाचा टोलनाका#amitthackeray #MNS pic.twitter.com/FcufHLF9AC
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 23, 2023
अमित ठाकरे यांना टोलनाक्यावर अर्धा तास बळजबरीने थांबवण्यात आल्याचे समजताच राज ठाकरे यांच्या समर्थकांनी समृद्धी महामार्ग टोल नाक्याची तोडफोड केली. यादरम्यान अमित ठाकरेंचा फास्ट टॅग ब्लॅक लिस्टेड करण्यात आल्याचीही बातमी समोर आली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घोषणाबाजीही करण्यात आली. पुन्हा असे झाल्यास पुन्हा तोडफोड करू असा इशाराही समर्थकांनी तोडफोडीदरम्यान दिला आहे.