Maharashtra Rain : (Ganeshotsav 2023) गणेशोत्सवासाठी कोकणात निघणाऱ्या चाकरमान्यांनी लगबग सुरु झालेली असतानाच आता काहींच्या घरांमध्ये, मंडळांमध्ये शेवटच्या टप्प्यातील तयारीला वेग आला आहे. आता या तयारीमध्ये पाऊस मात्र खोळंबा घालताना दिसत आहे. कारण, पावसानं गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोर धरला असून, पुढील 24 तासांसाठी पुणे, कोकण, ठाणे आणि पालघर भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस राज्यात पावासाचा जोर कायम राहणार असून, या धर्तीवर जवळपास 10 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुणे, नाशिक, साताऱ्यासह रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रविवारी विदर्भातील अकोला, वाशिम, खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तिथं मराठवाड्यातही अशीच परिस्थिती राहणार असून, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरुपाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
सध्या पावसासाठी पूरक असणारं कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र मध्य प्रदेशातील पूर्व भागावर आहे. त्यातच अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेगही वाढला आहे. ज्यामुळं उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. कोल्हापूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची हजेरी असेल.
मागील 24 तासांतील हवामानाचा अंदाज पाहायला झाल्यास अमरावतीला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. तर, नागपूर ,वर्धा आणि अकोला येथेही ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं हा इशारा जारी करत उर्वरित विदर्भातील यलो अलर्ट दिला होता. थोडक्यात आठवडी सुट्टी आणि नव्या आठवड्यासह यंदाच्या गणपतींचं स्वागतही पावसाच्याच उपस्थिती होणार हे आता स्पष्ट झालं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानुसार इथं कोकणापासून मराठवाड्यापर्यंत पावसाची हजेरी असतानाच तिथं हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर पाहायला मिळणार आहे. हिमाचलच्या मंडी, बिलासपूर, चंबा, कांगडा, सोलन आणि सिरमौर जिल्ह्यांना अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या मैदानी भागांमध्ये मुसळधार पावसाचा तर पर्वतीय भागांमध्ये बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.