Maharashtra Rain : राज्यात मागच्या काही दिवसांपासून पावसानं पुनरागमन केल्याचं पाहायाला मिळालं आहे. रखडलेली शेतीची कामं पुन्हा नव्यानं आणि वेगानं सुरु झाल्यामुळं बळीराजाचा उत्साहसुद्धा शिगेला पोहोचला आहे. त्यातच गणेशोत्सवाची लगबगही सुरुच आहे. त्यामुळं परतलेला हा पाऊस आणखी खास ठरत आहे. नव्या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाचा जोर समाधानकारक असेल. राज्याच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण जास्त असेल तर, कोकणात तो मध्यम ते हलक्या स्वरुपात बरसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेला मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा आता दक्षिणेकडे सरकताना दिसत आहे. 20 तारखेपर्यंत हा पट्टा अरबी समुद्राच्या दिशेनं पुढे जाणार असून, त्यामुळं महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण पाहायला मिळत आहे. ज्यामुळं नाशिक आणि नंदुरबारला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सोमवारी मुंबईसह कोकणात पावसाची समाधानकारक हजेरी असेल. तर, राज्याच्या काही भागांमध्ये मात्र पावसाचा जोर काही अंशी कमी होईल. मात्र काळ्या ढगांचं सावट मात्र कायम राहणार आहे. थोडक्यात येते काही दिवस राज्यात पावसाचेच असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
रविवारी नाशिकमध्ये दुपारपासून पावसानं हजेरी लावली. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार पाहायला मिळाली. त्यामुळे धरणाची पातळी वाढलीये. सध्या गंगापूर धरणातून 537 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. नदीकाठच्या रहिवाश्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
बदलापुरातही सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर हवामान खात्याने ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला. गेल्या एक आठवड्यापासून बदलापूर शहरात पावसानं विश्रांती घेतली होती. त्यामुळे उकाड्याने बदलापूरकर हैराण झाले होते. मात्र या पावसामुळे त्यांना दिलासा मिळालाय. जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वादळी वा-याचा फटका, कापूस, मका, केळी पिकं भुईसपाट झाली. तर, तापी नदीला पूर आला. तिथं नंदुरबार जिल्ह्यात नर्मदा नदी धोक्याच्या पातळीवर वाहत असल्यामुळं एक वेगळंच संकट डोकं वर काढताना दिसत आहे.