Maharashtra Rain : महाराष्ट्रात जुलै महिना गाजवणारा पाऊस ऑगस्ट महिन्यात मात्र दिसेनासा झाला आणि अखेर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यानंतर मात्र पाऊस परतल्याचं स्पष्ट होत आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार हिमालयाच्या दिशेनं गेलेले मान्सूनचे वारे आता पुन्हा एकदा सामान्य स्थितीमध्ये येणार असून, महाराष्ट्रात पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या बहुतांश भागांमध्ये विशेषत: विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल.
एकिकडे विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असतानाच दुसरीकडे राज्याच्या उर्वरित भागावर असणाऱ्या काळ्या ढगांची चादर कायम राहणार आहे. सध्याच्या घडीला मान्सूनच्या वाऱ्यांची स्थिती पाहता कर्नाटकच्या दक्षिणेकडील अंतर्गत पट्टा आणि कोमोरिन भागापर्यंतच्या क्षेत्रावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो सक्रिय असल्याचं हवामान विभागाचं सांगणं आहे. ज्यामुळं राज्याच मान्सून पुन्हा जोर धरताना दिसतोय.
मुंबई, नवी मुंबई, पश्चिम उपनगरामध्ये मात्र पावसाची रिपरिप पाहायला मिळणार आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरीसुद्धा बरसण्याची शक्यता आहे. पण, बहुतांश वेळांना मात्र या भागात पावसाची उघडीप पाहायला मिळणार आहे. कोकणातही चित्र काहीसं असंच असेल. ढगाळ वातावरणामुळं दमट वातावरणाची तीव्रता जाणवणार असून, तापमानात काही अंशांची वाढही नोंदवली जाऊ शकते. थोडक्यात पाऊस परतला असला तरीही त्याचं चकवा देणं मात्र अद्यापही सुरुच आहे.
राज्यात कमी-जास्त प्रमाणात पावसाची ये-जा सुरु असतानाच पावसाळी पर्यटनाला बहर आल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक धबधबे आणि काही गिरीस्थानांकडे जाण्याला अनेकजण प्राधान्य देत आहेत. माळशेज हे याच यादीतील एक ठिकाण. निसर्गानं मुक्तहस्तानं उधळण केलेल्या या घाटमाथ्यावरील भागामध्ये अनेक धबधबे पावसाळ्यात प्रवाहित होतात. त्यातलाच एक म्हणजे काळू धबधबा. पण, पर्यटकांचं आकर्षण असणाऱ्या या काळू धबधब्यावर येण्यास आता बंदी घालण्यात आली आहे.
माळशेजमधील काळू धबधब्याजवळ पाय घसरून एकजण बेपत्ता झाल्याची माहिती मंगळवारी समोर आली. हैदराबादमधील 4 तरुण या ठिकाणी फिरायला आले होते. पण, 24 तासांनंतरही बेपत्ता झालेल्या तरुणाचा ठावठिकाणा लागलेला नाही. दरम्यान बचाव पथकाची शोधमोहीम अजूनही सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.