मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय गरज? आठवलेंचा सवाल; म्हणाले, 'शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी...'

Ramdas Athawale Slams MNS Chief Raj Thackeray: रामदास आठवलेंनी आपल्या खास शैलीमध्ये अनेक विषयांवर भाष्य करताना मनसे अध्यक्षांची चांगलीच फिरकी घेतल्याचं पहायला मिळालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 8, 2024, 03:11 PM IST
मी असताना महायुतीला राज ठाकरेंची काय गरज? आठवलेंचा सवाल; म्हणाले, 'शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी...' title=
आठवलेंचं नाशिकमध्ये विधान (फाइल फोटो)

Ramdas Athawale Slams MNS Chief Raj Thackeray: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीत घेण्याची गरज नसल्याचं मत व्यक्त केलं आहे. नाशिकमधील पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केलं असून त्यांनी राज ठाकरेंवरही आपल्या खास शैलीत निशाणा साधला आहे. आठवलेंनी यावेळी उद्धव ठाकरेंवरही टीका केली. तसेच ईव्हीएमच्या विषयावरुन विरोधकांनाही खडे बोल सुनावले.

नाशिक दौरा आणि महायुतीच्या विजयावर भाष्य

"नाशिक विधानसभा निवडणुकीनंतर नाशिक दौऱ्यावर आलो आहे. लोकसभेला आमचा तोटा झाला पण विधानसभेला मोठ यश मिळाले आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 पैकी 14 जागांवर युतीने विजय मिळवला आहे. मागील काळात युती सरकारने चांगले निर्णय घेतले. त्यात लाडकी बहिण योजना यशस्वी ठरली," असं आठवले म्हणाले. तसेच विरोधकांवर निशाणा साधताना आठवलेंनी, "विरोधक संविधान राजकारणात आणत आहे पण संविधान कोणाच्या बापाच्या बापाला बदलता येणार नाही," असा टोला लगावला. विधानसभा निवडणुकीबद्दल आणि नंतरच्या घडामोडींबद्दल आठवलेंनी भाष्य केलं. "या विधानसभा निवडणुकीत मोठ यश आम्हला मिळालं. मुख्यमंत्री पदावरुनचा वाद आघाडीत होता. आमच्यात याबाबत कोणताच वाद नव्हता," असंही आठवले म्हणाले. "मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे, एकनाथ शिंदे हे नाराज नव्हते. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळावे, महामंडळ मिळावे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीने एकत्र लढावे सोबत आम्ही आहोत. आम्हाला पण योग्य जागा मिळाव्या अशी आमची मागणी आहे," असं आठवलेंनी आवर्जून नमूद केलं. 

राज ठाकरेंवर खोचक टीका

मनसेबद्दल बोलताना रामदास आठवलेंनी, "राज ठाकरे यांची हवा या निवडणुकीत गेली," असा टोला लगावला. "आमच्या शिवाय सरकार येणार नाही असं राज ठाकरे बोलले होते. त्याच्या सभेला गर्दी होते पण जागा येत नाहीत. राज ठाकरे युतीत येतील वाटत नाही. मी आहे तर त्याची काय गरज?" असा खोचक सवाल आठवलेंनी उपस्थित केला. पुढे बोलताना, "राज ठाकरे यांना महायुतीत घेणे योग्य ठरणार नाही. मुस्लिमविरोधी भूमिका घेणे योग्य नाही," असंही आठवले म्हणाले. "शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी आपले रंग बदलले. त्यात भगवे, निळा, हिरवा रंग होते पण आता त्यांनी भगवा रंग हातात घेतला आहे. भगव्या रंगाचा अर्थ महान आहे. भाजपचा हिंदुत्वाचा नारा मुस्लिमविरोधी नाही. जे मुस्लिम पाकिस्तान देशाला बळ देता त्यांच्याविरोधी आम्ही आहोत. मुस्लिम आपले बांधवच आहेत. बतेंगे तो कटेगे असं योगिजी बोले होते. मात्र त्याचा अर्थ, मोदींना पाठिंबा देणाऱ्यांनी एकत्र यावे, असा होता," असंही आठवले म्हणाले. 

उद्धव ठाकरेंनाही टोला

"पराभव उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागला. ते राहील किंव्हा आम्ही राहू अशी धमकी देऊन चालत नाही. त्यांनी चूक केली युतीतून बाहेर पडून. खोकेबाज, गद्दार असे बोलूनच शिंदे यांना जास्त जागा मिळाल्या. शपथविधीला परंपरा म्हणून विरोधकांनी येणे गरजेचे होतं. आमदार शपथ घेत नाही हे पण चुकीचे आहे. मग काल नाही तर आज का आमदार शपथ घेत आहेत?" असा सवाल आठवलेंनी उपस्थित केला. 

ईव्हीएमवरुन सुनावलं

"विरोधकांना माझं आव्हान रडीचा डाव खेळू नका. ईव्हीएम खराब म्हणाऱ्यांचं डोकं खराब आहे. लोकशाहीचा अपमान करू नका. आम्ही काँगेस काळात म्हणलो नाही ईव्हीएम खराब आहे. वाढीव मतदार आले ते वेळच्या आत मतदान केंद्रांवर आले होते," असं आठवले म्हणाले. पुढे बोलताना आठवलेंनी मारकरवाडी आंदोलनावर भाष्य केलं. "लोकांचं जे म्हणणं असेल त्यावर चौकशी व्हावी. एखादं मशीन खराब असू शकते त्यामुळे शंका सर्व ठिकाणी नको," असं आठवलेंनी म्हटलं. ईव्हीएममधील काँग्रेस काळातच आले आहे. निवडणूक आयोगाने यावर निर्णय घ्यावा. लोकसभेला जास्त जागा मिळाल्या तेव्हा ईव्हीएम खराब नव्हते का? आता आम्हाला जास्त जागा मिळाल्या त्यावर तुम्ही आत्मपरीक्षण करावे," असा सल्ला आठवलेंनी दिला.