'मातोश्री'वरच्या बैठकीत बाचाबाची! ठाकरे संतापून 'या' नेत्याला म्हणाले, 'तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपात'

Uddhav Thackeray Verbal Flight In Meeting: मागील काही दिवसांपासून हा नेता ठाकरेंवर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. अशातच आता ही बातमी समोर येत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 5, 2025, 10:48 AM IST
'मातोश्री'वरच्या बैठकीत बाचाबाची! ठाकरे संतापून 'या' नेत्याला म्हणाले, 'तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपात' title=
मातोश्रीवरील बैठकीमध्ये राडा (प्रातिनिधिक फोटो)

Uddhav Thackeray Verbal Flight In Meeting: विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसपूस पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे कोकणातील नेते राजन साळवी यांनी तर पक्ष सोडण्यापर्यंत निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळ आहे. अशा परिस्थितीमध्येच शनिवारी ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी कोकणातील निकालावरुन पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. या चर्चेमध्ये ठाकरे आणि साळवींमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थेट विनायक राऊत यांचं नाव घेत राजन साळवींनी गंभीर आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्यावर चांगलेच संतापले.

ठाकरे आणि साळवींमध्ये खडाजंगी

कोकणातील निकालावरून शनिवारी 'मातोश्री'वर खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. राजन साळवींनी शनिवारी उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर भेट घेतली. त्यावेळेस त्यांच्या सोबत तालुका प्रमुख, मुंबई आणि स्थानिक संपर्क प्रमुख उपस्थित होते. राजन साळवींनी विनायक राऊत यांच्यावर पराभवाचं खापर फोडत उद्धव ठाकरेंसमोर तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती सूत्रांनी दिली. उद्धव ठाकरेंनीही सगळं ऐकून घेतल्यानंतर राजन साळवींनाच खडे बोल सुनावले. विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबादार नाही का? असा उलट प्रश्न ठाकरेंनी साळेवींना विचारला. त्यावर राजन साळवींनी, विनायक राऊतांना 21 हजाराचा लीड दिल्याचं केलं स्पष्ट करताना त्यामुळे त्यांच्या पराभवाला मी जबाबदार कसा? असं उलट प्रश्न पक्षप्रमुखांना केला. साळवींचा हा प्रश्न ऐकून उद्धव ठाकरेंनी संतापून, "मग आता काय करू? विनायक राऊतांना पक्षातून काढू की जिल्हा प्रमुखाला काढू?" असा प्रतिप्रश्न केला. त्यावर राजन साळवींनी, "तो आपला निर्णय आहे", असे उत्तर दिले. 

सामंतांबरोबर व्यवहारिक संबंधांचे आरोप

इतकंच नाही तर राजन साळवींनी विनायक राऊत यांचे एकनात शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तसचे मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यासोबत व्यावहारिक संबंध असल्याचे आरोप केले आहेत. त्यावर, "तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपात", असं उद्धव ठाकरेंनी राजन साळवींना संतापून म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

नक्की वाचा >> 'अजित पवारांना संतोष देशमुख प्रकरणात...'; थेट फडणवीसांना इशारा! राजकारण तापलं

भाजपाच्या मार्गावर असल्याची चर्चा

राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालं असून महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं. यामध्ये कोकणातील राजन साळवी, वैभव नाईक यांचाही समावेश आहे. पराभवासाठी पक्षातील वरिष्ठ जबाबदार असल्याचं विधान राजन साळवींनी यापूर्वीच केलं होतं. म्हणूनच पक्षांतर्गत कलाहाला कंटाळून पराभवानंतर आता राजन साळवी हे शिवसेनेचा ठाकरे गट सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा असून ते भाजपामध्ये जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बातम्या समोर आल्यानंतर आणि त्यासंदर्भात बोलताना 'आपण योग्यवेळी योग्य निर्णय घेणार' असल्याचं सूचक भाष्य राजन साळवी यांनी केलं होतं.