'अजित पवारांना संतोष देशमुख प्रकरणात...'; थेट फडणवीसांना इशारा! राजकारण तापलं

Santosh Deshmukh Murder Case BJP Vs NCP: संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन आता सत्ताधारी भाजपा विरुद्ध अजित पवारांचा पक्ष आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 5, 2025, 10:49 AM IST
'अजित पवारांना संतोष देशमुख प्रकरणात...'; थेट फडणवीसांना इशारा! राजकारण तापलं title=
धस यांच्या विधानामुळे वाद (प्रातिनिधिक फोटो)

Santosh Deshmukh Murder Case BJP Vs NCP: बीडमधील केज जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन राज्यभरात मूक मोर्चांचं आयोजन केलं जात आहे. आज पुण्यामध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला असून परभणीमध्येही शनिवारी असाच मोर्चा पार पडला. मात्र या मोर्चामध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केल्याने आता महायुतीमधील भाजपा आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादीचा आक्षेप काय?

परभणीमधील मूक मोर्चामधील भाषणात सुरेश धस यांनी थेट अजित पवारांचा उल्लेख केल्याने यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी आक्षेप घेतला आहे. "देवेंद्र फडणवीसजी आपल्या पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी काल परभणीमधील मूक मोर्चात 'क्या हुआ तेरा वादा अजितदादा' अशा प्रकारे वक्तव्य करुन आदरणीय अजितदादाविषयी जी गरळ ओकली त्याबद्दल आपण त्यांना जाब विचारणार की त्यांचा बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?' असा खोचक सवाल अमोल मिटकरींनी उपस्थित केला आहे. 

राष्ट्रवादीचे सुरेश धस यांनाच प्रश्न

अमोल मिटकरींप्रमाणेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनीही अजित पवारांचा उल्लेख सुरेश धस यांनी केल्याचा उल्लेख करत भाजपाच्या या आमदाराचा काही प्रश्न विचारले आहेत. "स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येवरून आमदार सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करत आहेत. परभणीच्या सभेत अजित दादांना क्या हुआ तेरा वादा... म्हणून दादांना प्रश्न विचारणाऱ्या सुरेश धस यांना माझा प्रश्न आहे, आरोपी स्वतः होऊन आत्मसमर्पण करत आहेत मग गृहखातं झोपा काढत आहे का? निष्पक्ष चौकशी होईल म्हणून तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का?" असं पोस्ट करुन सुरज चव्हाण यांनी विचारलं आहे.

नक्की वाचा >> 'मातोश्री'वरच्या बैठकीत बाचाबाची! ठाकरे संतापून 'या' नेत्याला म्हणाले, 'तुम्हाला जायचं असेल तर जा भाजपात'

तसेच पुढे बोलताना, "स्वर्गीय संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जरी नेता, कार्यकर्ता जर चौकशीत दोषी आढळला तर अजितदादा त्यांच्यावर कार्यवाही करायला गय करणार नाहीत," असा विश्वासही सुरज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. 

अजित पवारांची बदनामी थांबली नाही तर...

"देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे आमदार सुरेश अण्णा धस यांना आवरावे. महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचं काम ते करत आहेत. विनाकारण अजितदादांना या प्रकरणात बदमान करण्याचं काम केलं तर जशास तस उत्तर आम्ही देऊ," असा इशारा सुरज चव्हाण यांनी दिला आहे. 

आता या प्रकरणामध्ये भाजपा काय प्रतिक्रीया नोंदवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.