Maharashtra Weather Update : मान्सूनचा मुक्काम संपून आता बराच काळ उलटलेला असला तरीही बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रामध्ये सुरु असणाऱ्या हालचाली पाहता महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये अवकाळी पावसाचं सावट पाहायला मिळत आहे. हवमान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या नाशिक आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढच्या दोन ते तीन दिवसांसाठी राज्यात अवकाळीचा तडाखा बसणार आहे. तर, पुढच्या 48 तासांमध्ये विदर्भात काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. नाशिक, पुणे, अहमदनगरसह बीड आणि औरंगाबादमध्येही पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या दरम्यान, गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळं शेतकऱ्यांना काळजी घेण्यातं आवाहन करण्यात आलं आहे.
सध्या ईशान्य अरबी समुद्रामध्ये सध्या चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, बंगालच्या खाडी भागामध्ये कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार झाला आहे. या संपूर्ण परिस्थितीच्या एकत्रिकरणामुळं 30 तारखेपासून वाऱ्यांच्या स्थितीत बदल होणार असून, 2 डिसेंबरच्या सुमारास चक्रीवादळामध्ये याचं रुपांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या देशातील तापमानात मोठे चढ उतार पाहायला मिळत आहेत. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळं उकाडा वाढला आहे. तर, उत्तर महाराष्ट्रात मात्र थंडीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. कोकण किनारपट्टी भागावरही पावसाचे ढग असते तरी इथं पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज आहे. तर, सातारा, सांगलीमध्ये किमान तापमानात घट नोंदवली जाऊ शकते अशीही माहिती समोर आली आहे.
सध्या हिमालयाच्या पश्चिम क्षेत्रांमध्ये एक पश्चिमी झंझातावत सक्रीय असून मंगळवारपासूनच त्याचे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं राजस्थानावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. पुढच्या 24 तासांमध्ये देशातील उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये बर्फवृष्टीची शक्यता आहे. लडाख आणि काश्मीरच्या खोऱ्यात याचं प्रमाण जास्त असेल. तर, उत्तराखंड, हिमाचल, पंजाबमध्ये तापमान 8 अंशांपर्यंत खाली येणार असून थंडीचा कडाका वाढणार आहे.