Devendra Fadnavis On Shyam Manav : उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर खोटे आरोप लावण्यासाठी देशमुखांवर दबाव होता. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ठाकरेंचं नाव घ्या आणि अॅफेडेव्हिटवर सही करा, आदित्य ठाकरेंचं दिशा सालियान प्रकरणात नाव घ्या, तुमची ईडी कारवाईतून सुटका करू अशी ऑफर अनिल देशमुखांना दिल्याचा दावा श्याम मानव यांनी केलाय. तर श्याम मानवांनी जे सांगितलं ते सत्यच आहे. आदित्य, उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांचा दबाव होता. 3 वर्षांपूर्वी फडणवीसांनी एक माणूस पाठवून अॅफिडेव्हीट पाठवले होते, असा म्हणत देशमुखांनी श्याम मानवांच्या दाव्यांना दुजोरा दिलाय.
गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लागला पाहिजे, यासाठी वारंवार अनिल देशमुख यांनी दबाव टाकला आणि गुन्हे दाखल करायला लावले. याचे पुरावे मी स्वत: दिले होते. सीबीआयने पुराव्यासहीत केस दाखल केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची मोडस ऑपरेंडी होती, हे आपण पाहिलं आहे. तुम्हाला माहिती असेल तर अनिल देशमुख जेलमधून बेलवर बाहेर आले आहेत, असं म्हणत फडणवीसांनी सुचक इशारा दिला आहे.
श्याम मानव मला ओळखतात. त्यांनी असे आरोप करण्याआधी मला विचारयला हवं होतं. अलीकडच्या काळात सुपारीबाज घुसले आहेत. माझा सिद्धांत पक्का आहे, मी कधी कोणाच्या नादी लागत नाही आणि नादी लागलो तर सोडत नाही. माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे. त्यात ते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सचिव वाझे यांच्याबद्दल काय बोलतायेत याची रेकॉर्डिंग आहे. पण मी अशा प्रकारचं राजकारण करत नाही. पण मी पुराव्यानिशी बोलत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, श्याम मानव यांनी केलेले आरोप गंभीर, खळबळजनक आणि महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यातील राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे आहेत. केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करत राज्यातील मविआ सरकार पाडून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, अजितदादा, आदित्य ठाकरे जी आणि अनिल परब साहेब यांना तुरुंगात डांबण्याचा कट रचणं हे पाताळयंत्री राजकारण आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी टीका केली होती.