जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे काही तास उरले आहेत. निवडणुका झाल्यानंतरच्या सगळ्याच एक्झिट पोलमध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही निकालाबाबत त्यांचं भाकित वर्तवलं आहे. महायुतीला २२० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज खडसेंनी वर्तवला आहे.
महायुतीत शिवसेना आणि भाजपानं बंडखोरीला लगाम घातला असता तर पाच-दहा जागा नक्कीच वाढल्या असत्या, पण तरीही महायुतीचीच सत्ता येईल, असंही खडसे म्हणाले आहेत.
भाजपने यंदा एकनाथ खडेंना विधानसभेचं तिकीट दिलं नाही, त्यामुळे खडसे नाराज झाले होते. खडसेंच्याऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. रोहिणी खडसे यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास एकनाथ खडसेंनी व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी शहरी मतदारांमध्ये जो उत्साह दिसला तो विधानसभा निवडणुकीवेळी दिसला नाही, अशी कबुली खडसेंनी दिली आहे. कमी मतदान झालं असलं तरी हे मतदान महायुतीला अनुकूल असल्याचं खडसेंना वाटत आहे.
जळगाव जिल्ह्यातल्या दोन-तीन मतदारसंघात चुरस आहे, पण सगळ्या जागांवर आमचा विजय होईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे.