मुंबई : राज्य सरकारनं कांदा आयात करण्याचा प्रयत्न केला तर तो हाणून पाडू असा इशारा मराठा क्रांती मोर्चा संघटनेनं सरकारला दिला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा शेतकऱ्याच्या आर्थिक संकटात वाढ होणार आहे. परदेशी आयात कांदा शेतमाल विकू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. या खेरीज हैद्राबाद एन्काऊंटर घटनेचं मराठा क्रांती मोर्चानं स्वागत केलं आहे. कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी शिक्षा सुनावल्या नंतर त्याची अंमलबजावणी करावी. कोपर्डी आरोपींना फाशी न दिल्यास उद्रेक होईल असा इशाराही संघटनेनं दिला आहे.
याआधी कांदा आयातीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही विरोध दर्शवला होता. मोदी सरकारचा हा आत्मघाती निर्णय आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली आहे. कांद्याचे भाव वाढून दोन महिने झाले. मग सरकारने आत्ताच का कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला, सरकारचा हा निर्णय आत्मघातकी आहे. तुर्कस्तानमधून ११ हजार टन कांदा आयात केल्यानंतर बाजारपेठत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळतील, अशी भिती राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचा कांदा बाजारपेठ येत असताना सरकार आत्ता का कांदा आयात करत आहे. ग्राहकाला दिलासा द्यायचा होता तर आधीच का कांदा आयात केला नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला विचारला आहे.
तुर्कस्तानमधून कांदा आयात केल्यानं कांद्याचे भाव प्रचंड पडतील. आता कुठे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा चांगला पैसा मिळत होता. त्याचवेळी केंद्र सरकारने कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, उन्हाळी कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे. अशावेळी कांदा आयात केल्याने येथील कांद्याचे दर कोसळतील, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे कधी नव्हे कांद्याला विक्रमी भाव मिळतो आहे. मात्र असं असलं तरी बऱ्याच शेतकऱ्यांकडे कांदाच शिल्लक नसल्याने भाव मिळूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा खिसा मात्र रिकामाच असल्याची परिस्थिती आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चाळीत कांदाच शिल्लक राहिला नाही. विशेष म्हणजे गतवर्षी दुष्काळी परिस्थिमुळे उन्हाळी कांद्याचे अल्प उत्पादन आलं होतं. गरजेपोटी शेतकऱ्यांनी हा कांदा सुरवातीलाच मातीमोल भावात विक्री केला. परतीच्या पावसाने लाल कांदा बाजारात यायला उशीर झाला. त्यामुळे उन्हाळ कांद्याला विक्रमी भाव मिळत असतांना आज शेतकऱ्यांच्या चाळीत फारसा कांदा शिल्लक नाही. त्यामुळे कांदा भावाचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच जास्त होतांना दिसतो आहे.