MHADA Ambernath 2 Project: स्वस्तात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने नवीन प्रकल्पाची घोषणा केली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली असून हा प्रकल्प ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये असणार आहे. या प्रकल्पामध्ये एकूण 1533 घरं असणार आहे. विशेष म्हणजे ही घरं अल्प आणि मध्यम गटासाठी असणार आहेत. त्यामुळेच या प्रकल्पाच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना त्यांच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात साकारता येणार आहे. अंबरनाथमधील या दीड हजारांहून अधिक घरांसाठीच्या प्रकल्पाची निवाद कोकण मंडळाने नुकतीच प्रसिद्ध केली असून या कामाला आता गती मिळणार आहे.
अंबरनाथमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी ही 1533 घरं बांधली जाणार आहेत. यामध्ये मौजे शिवाजीनगर येथे एकूण 759 घरं म्हाडाकडून बांधली जाणार आहे. या 759 घरांपैकी 351 घरं ही अल्प गटासाठीची आणि 408 घरं मध्यम गटासाठी असणार आहेत, असं म्हाडाने स्पष्ट केलं आहे. याशिवाय कोहोज खुंटवली येथे म्हाडा 774 घरं बांधणार आहेत. यामधील 354 घरं अल्प तर 420 घरं मध्यम उत्पन्न गटासाठी असणार आहेत. या दोन्ही प्रकल्पांच्या बांधकामासाठी म्हाडाने दोन वेगवेगळ्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. 21 ऑगस्टपर्यंत निविदा सादर करता येणार आहेत. 23 ऑगस्टला तांत्रिक निविदा खुल्या केल्या जातील. निविदा प्रतिक्रिया म्हाडाकडून पूर्ण करत बांधकामाचे कंत्राट दिले जाईल.
लवकरात लवकर निविदा प्रतिक्रिया पूर्ण करुन बांधकाम सुरु करण्याचा कोकण मंडळाचा मानस आहे. प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर 3 वर्षात म्हणजेच 36 महिन्यांमध्ये ही घरं बांधून देणं नियुक्त केलेल्या बिल्डरला बंधनकारक असणार आहे. तशी अटच निविदेसंदर्भातील कागदोपत्री व्यवहार करताना घातली जाणार आहे. त्यामुळेच हे दोन्ही प्रकल्प 2027 ते 2028 पर्यंत पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मागील अनेक वर्षांपासून म्हाडाच्या उच्च उत्पन्न गटातील घरांना कमी प्रतिसाद मिळत असल्याचं लक्षात आल्याने आता म्हाडाकडून प्रामुख्याने अल्प आणि मध्यम गटातील वर्गांसाठी प्रामुख्याने घरांचे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. अंबरनाथमधील दोन्ही प्रोजेक्ट हे अशाच परवडणाऱ्या घरांचे आहेत. या घरांसंदर्भातील सविस्तर तपशील निविदा जारी केल्यानंतर समोर येईल असं सांगितलं जात आहे. अंबरनाथ हे सध्या मुंबईच्या प्रमुख उपनगरांपैकी एक असून मध्य रेल्वेच्या मार्गावरील ते प्रमुख स्थानक आहे. येथील घरांना दिवसोंदिवस मागणी वाढत असल्याने भविष्यात येथील गुंतवणूक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.