मुंबई : पोलीस बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गैरव्यवहारावर विधानसभेत आज नेमके बोट ठेवण्यात आले. यावेळी सत्ताधारी आमदारांनीच सरकारवर टीका केली. वाहतूक पोलिस कामावर जाताना रिकाम्या खिशाने जातो. पण, घरी येताना मात्र चार ते पाच हजार घेऊन येतो. लोकांना शिस्त लागण्यासाठी मोबाईलवरही दंड आकारला पाहिजे. कारण असे पैसे खिशात घातले जातात अशी टीका शिवसेना आमदार आशिष जैस्वाल यांनी केली.
तर, पोलीस बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होतो. हे थांबवले पाहिजे. बदल्या कशा होतात ते सर्वांना माहित आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी कनिष्ठ दर्जाच्या पोलिसांना पैसे वसूल करण्यासाठी टार्गेट देतात असा थेट आरोप तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केला.
भाजप आमदार समीर कुणावार यांनी 'माझ्या मतदारसंघात पोलीस मदत केंद्र आहे. पण, ते केंद्र पोलिसांना मदत करा असं झालंय. काही पोलीस खासगीत सांगतात की टार्गेट दिलं गेलंय. त्यामुळे पोलिसांकडूनच पैशांची वसुली केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई म्हणाले, तालिका सभापती संजय शिरसाठ यांनी केलेल्या आरोपांची तात्काळ चौकशी केली जाईल. आमदार कुणावर यांनी केलेल्या आरोपाची गंभीर दखल घेतली जाईल.
लोकांकडून जो दंड आकारला जातो तो वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी. कुणी जर नियम मोडला तरच दंड आकारला जातो. हा दंड आकारल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर दंडाची पावती पाठवली जाते. मात्र, आमदार जे आरोप करताहेत त्यांनी पुरावे द्या. मी कारवाई करतो. मात्र, कोणीही येईल आणि आमच्या पोलिसांवर काही ही आरोप करेल हे चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.