सत्ता काबीज करण्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत, निवडणुकीची थट्टा म्हणत राज ठाकरे यांचा हल्लाबोल

प्रभाग पद्धतीने निवडणूक लढवण्याचा उद्देश काय हे राज्य सरकारने स्पष्ट करावं

Updated: Sep 23, 2021, 02:43 PM IST
सत्ता काबीज करण्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धत, निवडणुकीची थट्टा म्हणत राज ठाकरे यांचा हल्लाबोल title=

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये त्यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारच्या प्रभागरचनेवर जोरदार टीका केली आहे. फक्त सत्ता काबीज करण्यासाठी बहुसदस्यीय पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी टीका करत राज ठाकरे यांनी प्रभाग पद्धतीने निवडणूक लढवण्याचा उद्देश काय हे राज्य सरकारने स्पष्ट करावं, असा सवाल केला आहे.

देशात अशी कोणतीही पद्धत नाही

2012 मध्ये काँग्रेस आणि राष्टवादी काँग्रेसचं सरकार असताना एक उमेदवार होता, त्यानंतर त्यांनी एक प्रभाग पद्धत सुरु केली. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचं जेव्हा सरकार आलं तेव्हा त्यांनी चार प्रभाग पद्धत सुरु केली. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर पुन्हा एक प्रभाग पद्धतीचा प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार निवडणुकी आयोगाने राज्य सरकारला कळवलं एक उमेदवारचं उभा करायचं. आता परत काल महाविकास आघाडी सरकारने ठरवलं की 3 प्रभाग पद्धत करायचा. मुळात देशात अशी कोणतीही पद्धत नाही. कोणत्याही राज्यात, कोणत्याही महापालिकेत अशा प्रभाग पद्धतीने निवडणूक लढवत नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात ही पद्धत कुठून सुरु झाली ?

कायद्याने पाहिलं तर खासदार, आमदार आणि महापालिकेला एक उमेदवार, अगदी ग्रामपंचायतीसाठीही एक उमेदवार, अशीच पद्धत आहे. हे महाराष्ट्रात कुठून सुरु झालं आणि का, याचं एकमेव कारण म्हणजे सत्ता काबिज करणं, आपापल्या पद्धतीने प्रभाग तयार करायचा आणि त्यातून पैसा ओतून निवडणुका जिंकणं हा हेतू असतो, असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.  या गोष्टींचा त्रास लोकांना का, लोकांनी एका उमेदवाराला मतदान करण्याऐवजी तीन-तीन उमेदवारांना मतदान का करायचं, तीन तीन मशीनवर बटणं का दाबायची, जनतेला गृहीत धरायचं, आपल्याला हवे आहेत त्याप्रमाणे प्रभाग करायचे, हे योग्य नाही, कायदेशीर नाही, खरंतर निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

देशात असा कायदा नसताना, महाराष्ट्र काय वेगळा आहे का, महाराष्ट्रात वेगळा कायदा आहे का असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.  दोनचे प्रभाग, तीनचे प्रभाग, चारचे प्रभाग हा कसला खेळ सुरु आहे. उद्या तुम्ही तीन-तीन आमदारांचा प्रभाग करणार आहात का? तीन तीन खासदारांचा प्रभाग करणार आहात का? महापालिकेला फक्त प्रभाग हे यांच्या फायद्याचं असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

याविरोधात लोकांनी कोर्टात जावं

याविरोधात लोकांनी कोर्टात जावं, लोकांनी निवडणूक आयोगाकडे जावं अशी माझी लोकांना विनंती आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. प्रभाग पद्धतीत कोणताही नगरसेवक दुसऱ्या नगरसेवकाला काम करायला देत नाही, एका नगरसेवकाने प्रस्ताव टाकला, तर दुसरा त्याला विरोध करतो. त्यामुळे प्रभागामध्ये कामं होत नाहीत.  उद्या लोकांनी ठरवलं की नगरसवेकाला भेटायचं आहे तर कोणत्या नगरसेवकाला त्यांनी भेटायचं. म्हणजे पूर्ण निवडणूकीची थट्टा करुन ठेवली आहे.