Raj Thackeray on Karnataka Election: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा (BJP) दारुण पराभव केला आहे. काँग्रेसने (Congress) 224 पैकी 136 जागा जिंकत कर्नाटकात ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या पराभवासह भाजपाला दक्षिणेतील एकमेव राज्यंही गमवावं लागलं आहे. तर काँग्रेसला 10 वर्षांनी जनतेने सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. दरम्यान या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली असून, भाजपावर टीका केली आहे.
"मी एका भाषणात विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो तर सत्ताधारी पक्ष हारत असतो असं म्हटलं होतं. हा स्वभावाचा, वागणुकीचा परिणाम आहे. आपलं कोण वाकडं करु शकतं अशा विचारांचा हा पराभव आहे. जनतेला, लोकांना कधीही गृहित धरु नये. या निकालातून सर्वांनी हे बोध घेण्यासारखं आहे," असं सांगत राज ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. कर्नाटकमधील विजय हा राहुल गांधी यांच्या भारत जोडी यात्रेचा परिमाण असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
कर्नाटकमध्ये 10 मे रोजी एका टप्यात मतदान पार पडलं होतं. यावेळी राज्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती. दरम्यान, शनिवारी सकाळी मतमोजणी होणार असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. भाजपाकडून प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेते मैदानात उतरले होते. भाजपाने जोरदार प्रचार केला असल्याने त्यांना सहज विजय मिळेल असे अंदाज व्यक्त होते. तर काहीजण काँग्रेस आणि भाजपात चांगली झुंज होईल असा विश्वास व्यक्त करत होते. पण मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच काँग्रेसने आघाडी घेतली आणि ती विजयापर्यंत नेली.
काँग्रेसने 2018 पेक्षाची चांगली कामगिरी केली. काँग्रेसने 136 जागा जिंकल्या असून 2018 च्या तुलनेत 56 जागा अधिक मिळाल्या. तर सत्ताधारी भाजपाला मात्र मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. भाजपला फक्त 65 जागांवर विजय मिळाला. त्यांनी 39 जागा गमावल्या आहेत. तर जनता दलाच्या जागा 18 ने कमी झाल्या. त्यांना फक्त 19 जागा जिंकता आल्या.
राहुल गांधी यांनी या निवडणुकीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, कर्नाटकात द्वेषाची बाजारपेठ बंद झाली असून प्रेमाचे दुकान सुरू झाले आहे. आम्ही कोणत्याही द्वेष भावना, वाईट भाषा यांचा वापर न करता निवडणूक लढवली त्याबद्दल आनंद वाटतो. राज्याचे लोक, पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांचे मी आभार मानतो.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसचं अभिनंदन केलं आहे. तर कर्नाटकात यापुढे जोमाने काम करु असा विश्वास व्यक्त केला आहे. कर्नाटक निवडणुकीमधील विजयाबद्दल काँग्रेसचे अभिनंदन. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. कर्नाटकमध्ये आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांचे आभार. भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर मेहनतीचे कौतुक आहे. आगामी काळात आम्ही कर्नाटकसाठी अधिक जोमाने काम करू असं ते म्हणाले आहेत.