IPL च्या अंतिम सामन्यातील 'त्या' घटनेवर राज ठाकरेंची जाहीर टीका, म्हणाले "ही आपल्याकडची..."

MNS Raj Thackeray on IPL: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपातलाकीन स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे योग्य यंत्रणा नसल्याचं सांगत नाराजी जाहीर केली आहे. यासाठी त्यांनी आयपीएलच्या अंतिम सामन्यात (IPL Final) पाऊस पडल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीचा दाखला दिला.   

शिवराज यादव | Updated: Jun 11, 2023, 01:49 PM IST
IPL च्या अंतिम सामन्यातील 'त्या' घटनेवर राज ठाकरेंची जाहीर टीका, म्हणाले "ही आपल्याकडची..." title=

MNS Raj Thackeray on IPL: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपातलाकीन स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे योग्य यंत्रणा नसल्याचं सांगत नाराजी जाहीर केली आहे. यासाठी त्यांनी आयपीएलच्या (IPL) अंतिम सामन्यात पाऊस पडल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीचा दाखला दिला. गुजरात आणि चेन्नईमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात पाऊस पडल्याने सामना राखीव दिवशी खेळवण्यात आला होता. मात्र राखीव दिवशीही दुसऱ्या डावाच्या आधी पाऊस पडल्याने सामना रात्री 2.30 पर्यंत खेळला गेला होता. नेमकं यावरच राज ठाकरेंनी बोट ठेवलं आहे. 

"...मतदानाच्या वेळी कुठे जाता?"; राज ठाकरेंची मतदारांना विचारणा, म्हणाले "जे पिळवणूक करतात त्यांच्याच हाती..."

 

मुंबईत मनसेचा साधन सुविधा विभागाचा पाचवा वर्धापन दिन पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी आपातकालीन स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे यंत्रणा नसल्याचं सांगत प्रशासनावर हल्लाबोल केला. याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की, "जगभरात आपातकालीन घटना घडतात तेव्हा त्यांच्याकडे किती चांगली यंत्रणा असते. काही दिवसांपूर्वी मी शारजाचा फोटो पाहिला. पावसाने मैदान भिजलं असता इतर यंत्रण्या होताच, पण मैदान सुकवण्यासाठी हेलिकॉप्टर आणण्यात आलं होतं. आणि आपल्याकडे अहमदाबादमध्ये पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी सामना. हेअर ड्रायरने मैदान सुकवत होते. ही आपल्याकडची आपातकालीन यंत्रणा आहे".

चार नद्या आपण मारुन टाकल्या

"मी यावेळी तयार राहा असं सांगितलं आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात दरडी कोसळतील. सरकारसह आपणही सतर्क राहिलं पाहिजे," असा सल्ला त्यांनी दिला. दरम्यान राज ठाकरेंनी यावेळी पुन्हा एकदा परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांचा विषय मांडला. "एखाद्या भागात बाहेरच्या लोकांनी किती यावं आणि असणारी यंत्रणा किती बिघडावी. नाले कोणामुळे तुंबत आहेत? राज्याच्या बाहेरुन लोक येणार, त्या नाल्याच्या चारही बाजूंनी झोपडपट्या उभ्या करणार, त्यातच सांडपाणी टाकणार. मला वाटायचं मला मुंबईत तीन नद्या आहेत. एकच उरली आहे मिठी नदी, तिलाही अशा मिठ्या मारल्यात की त्यातून ती बाहेरच येत नाही. पण मी पाणीतज्ज्ञ चितळे यांना भेटलो तेव्हा त्यांनी पाच नद्या होत्या असं सांगितलं. त्यातील चार आपण मारुन टाकल्या. पाचवी आता मरायला आली आहे," असा संताप राज ठाकरेंनी व्यक्त केला. 

परप्रांतीय लोंढ्यांमुळे मुंबईवर भार

"मुंबईला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन आहे त्याचा बाजूला लागून कित्येक हजार झोपड्या आहेत. याचं कारण प्रशासन, आमदार, खासदार यांचं लक्ष नाही. आमची मतं वाढवा, जमिनीचे भाव वाढवा, पैसे कमवू द्या, मतदान करा आणि मरा असंच सुरु आहे. काही गोष्टी या नैसर्गिक नसतात. पण काही गोष्टी माणसाने निर्माण केलेल्या असतात," अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. या गोष्टी चव्हाट्यावर आणल्या पाहिजेत असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.